बंगालमध्ये अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी नागरिक संतप्त, पोलीस स्टेशन पेटवले

बंगालमध्ये अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी नागरिक संतप्त, पोलीस स्टेशन पेटवले

पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूरमध्ये मंगळवारी अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी लोकांनी तीव्र निदर्शने केली. या निदर्शनांना रोखण्यासाठी पोलिसांनी लोकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या प्रकरणातील आरोपींना अटक करून कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी उत्तर दिनाजपूरमधील कालियागंज येथील नागरिकांनी तीव्र निदर्शने केली.

काही वेळातच नागरिकांच्या या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करायला सुरूवात केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. तर काही आंदोलन करणाऱ्या लोकांनी पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या परिसरात लावलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला आणि मालमत्ता आणि वाहनांची जाळपोळ केली. तसेच लोकांनी पोलीस स्टेशनला आग लावण्याचा देखील प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या
अल्पवयीन मुलीच्या मृत्यूप्रकरणी लोकांनी आंदोलन केल्यानंतर या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

काय आहे प्रकरण?
पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात एका अल्पवयीन दलित तरुणीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. ज्यानंतर या ठिकाणी मोठा हिंसाचार झाला. ग्रामस्थांनी तरुणीचा मृतदेह नेण्यासाठी आलेल्या पोलिसांवर दगडफेक देखील केली. पण तरूणीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तो फरफटत नेण्यात आला. ज्यामुळे लोकांमध्ये आणखी हिंसा पाहायला मिळाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर मृत मुलगी बेपत्ता होती. परंतु, याबाबत तिच्या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती. त्यानंतर कालियागंज परिसरातील एका कालव्यात मुलीचा मृतदेह तरंगताना आढळला. पोलीस मुलीचा मृतदेह घेण्यासाठी पोहोचले तेव्हा त्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी घटनास्थळी जमलेल्या जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालात विषारी द्रव्य प्राशन केल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर या प्रकरणी एका 20 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असवल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तसेच मुलगी व आरोपी हे एकमेकांना ओळखत होते, अशी माहिती सुद्धा समोर आली आहे.


हेही वाचा – Liquor Policy Case : सीबीआयच्या आरोपपत्रात मनीष सिसोदिया यांचे नाव

First Published on: April 25, 2023 6:43 PM
Exit mobile version