Pakistan crisis: पाकिस्तानात गव्हाच्या पिठासाठी ‘गृहयुद्ध’; 160 रुपये किलोने विकले जातंय पीठ, परिस्थिती का आली?

Pakistan crisis: पाकिस्तानात गव्हाच्या पिठासाठी ‘गृहयुद्ध’; 160 रुपये किलोने विकले जातंय पीठ, परिस्थिती का आली?

इस्लामाबादः पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. चिकन प्रतिकिलो ६५० रुपये, घरगुती गॅस सिलिंडर प्रति १० हजार रुपये, मैदा २०० रुपये किलो आणि पेट्रोल १५० रुपये लिटरने विकले जात आहे. शेजारील देश पाकिस्तानमध्ये महागाईवरून आरडाओरड सुरू आहे. पाकिस्तान सध्या गव्हाच्या तीव्र टंचाईला तोंड देत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गव्हाच्या पिठासाठी भांडणं होत आहेत. कुठे पीठ नाही, तर कुठे त्याचे भाव गगनाला भिडले आहेत. पिठाचे भाव इतके वाढले आहेत की, ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. जगाकडे मदतीसाठी याचना करणारे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांना या अडचणीचा सामना कसा करायचा हेही कळत नाही. सर्वात महत्त्वाचा खाद्यपदार्थ असलेले पीठ उपलब्ध नसेल, तर देशाच्या वाईट स्थितीचा अंदाज तुम्हीच लावू शकता. पण त्यानंतर असे काय झाले की या देशाला तीव्र टंचाईचा सामना करावा लागला.

गव्हाच्या पिठासाठी आरडाओरड
पाकिस्तानातील कराचीमध्ये सध्या एक किलो मैदा 140 ते 160 रुपये किलो दराने विकला जात आहे. इस्लामाबाद आणि पेशावरमध्ये 10 किलोची पिशवी 1500 रुपयांना तर 20 किलोची पिशवी 2800 रुपयांना विकली जात आहे. पंजाब प्रांताबद्दल बोलायचे झाल्यास इथे गिरणी मालक 160 रुपये किलो दराने पीठ विकत आहेत. खैबर पख्तुनख्वामध्ये 20 किलोच्या गव्हाच्या पिठाच्या पिशवीची किंमत 3,100 रुपये आहे. किमतींवर नियंत्रण ठेवण्याचे सरकारचे सर्व प्रयत्न पूर्णपणे फोल ठरले आहेत. गव्हाच्या पिठाच्या टंचाईमुळे लोकांमध्ये मारामारीही होऊ लागली आहे. या संकटामुळे खैबर, सिंध आणि बलुचिस्तानमध्ये हिंसाचाराचे वातावरण आहे.

10 तास रांगेत ताटकळत
लोक रोज 10 तास रांगेत उभे आहेत आणि मगच त्यांना पीठ मिळत आहे. गव्हाचा सर्वात मोठा तुटवडा पंजाब आणि लगतच्या प्रांतात आहे. या संकटासाठी लोक शहबाज आणि त्यांच्या सरकारला दोष देत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे मंत्री किती गहू निर्यात करायचा आहे, याचा अंदाज देखील लावू शकत नाहीत. चुकीच्या आधारे गव्हाची निर्यात केली जात होती आणि त्यामुळेच आज ही परिस्थिती ओढावली आहे.

खरे कारण काय?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या टंचाईचे मुख्य कारण केंद्र आणि पंजाब सरकारमधील भांडण आहे. पंजाब अन्न विभागाचा अंदाज पूर्णपणे चुकीचा निघाला आहे. या अंदाजाच्या आधारे केंद्र सरकारकडून गव्हाची खरेदी करण्यात आली. बलुचिस्तानचे अन्न मंत्री जमराक अछाजकाई म्हणाले की, त्यांच्या राज्याला पाहिजे तेवढा गहू मिळाला नाही. पंजाबचे मुख्यमंत्री परवेझ इलाही यांनी आश्वासन दिल्याचे ते म्हणतात. मात्र त्यांनी गव्हाचा संपूर्ण साठा न पाठवून दिलेले वचन मोडले. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बलुचिस्तानमध्ये तीव्र टंचाई
ते म्हणाले की, बलुचिस्तान 85 टक्के गव्हासाठी पंजाब आणि सिंधवर अवलंबून आहे. दोन्ही प्रांतांनी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. गव्हाचा तुटवडा आणि महागडे पीठ यामुळे पाकिस्तानमध्ये आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. ऑक्टोबरमध्ये पीएम शेहबाज म्हणाले होते की, देशात गव्हाचा पुरेसा साठा आहे आणि खासगी आयातीला परवानगी दिली जाणार नाही.


हेही वाचाः पश्चिम बंगालमध्ये भाजपचे जनसंपर्क अभियान; लोकसभा निवडणुकीची तयारी

First Published on: January 11, 2023 8:36 AM
Exit mobile version