पश्चिम बंगालमध्ये भाजपचे जनसंपर्क अभियान; लोकसभा निवडणुकीची तयारी

जनसंपर्क अभियानातंर्गत भाजपचे सर्व नेते व पदाधिकारी जनतेशी संवाद साधणार आहेत. प्रत्येक बूथचा अभ्यास केला जाणार आहे. बूथ स्तरावर जनतेच्या कामांचे नियोजन योग्यरितीने होते आहे का?, त्यामध्ये काही दोष आहे का?, दोष सुधारणेसाठी काय करावे लागेल, याची आखणी केली जाणार आहे. मार्च-एप्रिलमध्ये हे अभियान सुरु होईल. या अभियानासाठी बूथ समित्यांची बांधणी नव्याने केली जाईल. बूथ स्तरावर नवीन चेहऱ्यांना प्राध्यान दिले जाणार आहे. 

नवी दिल्लीः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पश्चिम बंगालमध्ये नियोजन सुरु केले आहे. सर्वसामान्यांपर्यंत भाजपचे काम पोहोचवण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनसंपर्क अभियान राबवले जाणार आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे याचाही आलेख भाजप जनतेसमोर ठेवणार आहे.

जनसंपर्क अभियानातंर्गत भाजपचे सर्व नेते व पदाधिकारी जनतेशी संवाद साधणार आहेत. प्रत्येक बूथचा अभ्यास केला जाणार आहे. बूथ स्तरावर जनतेच्या कामांचे नियोजन योग्यरितीने होते आहे का?, त्यामध्ये काही दोष आहे का?, दोष सुधारणेसाठी काय करावे लागेल, याची आखणी केली जाणार आहे. मार्च-एप्रिलमध्ये हे अभियान सुरु होईल. या अभियानासाठी बूथ समित्यांची बांधणी नव्याने केली जाणार आहे. बूथ स्तरावर नवीन चेहऱ्यांना प्राध्यान दिले जाणार आहे.

सर्व केंद्रीय मंत्र्यांवर जबाबदारी

बूथ व मंडळ स्तरावर बदल करताना सर्व केंद्रीय मंत्र्यांना मतदारसंघात भेटीगाठी, प्रचार व प्रसार करण्याचे काम दिले आहे. मंत्री धर्मेंद्र प्रधान, स्मृती ईराणी, पंकज चौधरी, साध्वी निरंजन ज्योति या सर्वांवर ४ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. मतदारसंघात भाजपच्या कामांचा प्रचार व प्रसार करण्याची जबाबदारी या मंत्र्यांवर आहे. केंद्र सरकारने राबवलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम हे मंत्री करणार आहेत.

अमित शाह, जे.पी.नड्डा करणार दौरा

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. मात्र लवकरच त्याची घोषणा होईल, असे बोलले जात आहे. यासाठी स्वंतत्रपणे नियोजन केले जात आहे. ज्या विभागात भाजपला कमी प्रतिसाद आहे, तेथे प्रभावीपणे काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला. मात्र २०१९ च्या निडणुकीत भाजपने १९ जागांवर विजय मिळवला. आगामी निवडणुकीत हा आकडा वाढवण्यासाठी भाजपने नियोजन सुरु केले आहे.