गंगा स्वच्छतेच्या आग्रहामुळे स्वामी सानंद यांचा उपोषणादरम्यान मृत्यू

गंगा स्वच्छतेच्या आग्रहामुळे स्वामी सानंद यांचा उपोषणादरम्यान मृत्यू

ज्येष्ठ पर्यावरणवादी प्राध्यापक जी. डी. अग्रवाल उर्फ स्वामी ज्ञान स्वरूप सानंद

गंगा नदीतील प्रदुषण दूर करण्यासाठी सरकारने नमामी गंगे हा प्रकल्प सुरु केला होता. या प्रकल्पाला अपेक्षित निकाल मिळाला नाही. त्यामुळेच ज्येष्ठ पर्यावरणवादी प्राध्यापक जी. डी. अग्रवाल उर्फ स्वामी ज्ञान स्वरूप सानंद यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. २२ जूनपासून ते उपोषणाला बसले होते. तब्बल १११ दिवस त्यांचे हे उपोषण सुरु होते. मध मिश्रित पाणी पिऊन त्यांचे हे उपोषण सुरु होते. मात्र पोलिसांनी त्यांना अटक केल्यामुळे त्यांनी पाणी पिणेही सोडले होते. यादरम्यानच त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना हरिद्वारमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने त्यांचे निधन झाले आहे. ते ८६ वर्षांचे होते.

कोण होते जी. डी. अग्रवाल?

उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात एका शेतकरी कुटुंबात अग्रवाल यांचा जन्म झाला होता. उत्तराखंडमधील रुरकी आयआयटीमधून त्यांनी सिविल इंजिनिअरची पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया विश्वविद्यापीठातून पीएचडी मिळवली होती.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे ते प्रथम सचिव सदस्य होते. त्यासोबतच कानपूर आयआयटीमध्ये सिविल इंजिनिअर विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. गांधीवादी विचारांवर त्यांचा गाढ विश्वास होता. यासाठीच त्यांनी २०११ रोजी सन्यास घेत सन्यास्याप्रमाणे जीवन जगण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गंगा स्वच्छता मोहीमेशी त्यांन स्वतःला जोडून घेत या विषयासाठी स्वतःचे आयुष्य समर्पित केले.

उपोषणादरम्यान प्राध्यापक अग्रवाल यांनी सांगितले होते की, आम्ही प्रधानमंत्री आणि जलसंसाधन मंत्रालयाला गंगा नदीच्या स्वच्छतेबाबत अनेक पत्र लिहिली होती. मात्र सरकारकडून कोणतेही उत्तर आले नाही. अग्रवाल यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते रमेश पोखरियाल यांनी अनेक प्रयत्न केले, मात्र अग्रवाल आपल्या निर्णयावर ठाम राहिले होते.

First Published on: October 11, 2018 6:38 PM
Exit mobile version