Over Hiring केल्यामुळे कंपनी तोट्यात, स्विगीकडून ३८० कर्मचाऱ्यांना नारळ

Over Hiring केल्यामुळे कंपनी तोट्यात, स्विगीकडून ३८० कर्मचाऱ्यांना नारळ

Swiggy Layoff | नवी दिल्ली – जागतिक मंदीच्या लाटेत सर्व कंपन्या होरपळत असल्याने आर्थिक नुकसानीतून बाहेर पडण्याकरता कंपन्यांनी कर्मचारी कपातीला सुरुवात केली आहे. फुड डिलिव्हर करणाऱ्या स्विगीनेही आता ३८० कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. आम्हाला आमची टीम लहान करायची आहे, त्यामुळे कर्मचारी कपातीचा आम्ही अत्यंत कठीण निर्णय घेतला आहे, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

कर्मचारी कपातीबाबत कंपनीचे सीईओ श्रीहर्ष मजेटी यांनी कर्मचाऱ्यांना मेल पाठवले आहेत. सर्व पर्यायांवर विचार करून झाल्यावर आम्ही हा निर्णय घेतला आहे, असं श्रीहर्ष मजेटी यांनी कर्मचाऱ्यांना मेलमध्ये लिहिलं आहे. तसंच, कर्मचारी कपात करण्याची असंख्यही कारणंही त्यांनी मेलमध्ये दिली आहेत. आव्हानात्मक मॅक्रो इकॉनॉमिक परिस्थिती हे त्यातील एक कारण त्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून कंपनी विविध समस्यांचा सामना करत आहे. फूड डिलिव्हरी क्षेत्रात ग्रोथ रेट कमी आहे. त्यामुळे त्यातून होणारा नफाही घटला आहे. त्यामुळे, कंपनी सुरू राहण्याकरता त्यांच्याकडे फार कमी नगदी भांडवल शिल्लक राहिलं आहे. OverHiring केल्यामुळे कंपनीची ही अवस्था झाली आहे. त्यामुळे कंपनीकडून कर्मचारी कपात केली जात आहे, असं स्पष्टीकरण सीईओंकडून करण्यात आलं आहे.

हेही वाचा – ट्विटर, मेटा, अॅमेझॉननंतर सिस्को आणि झोमॅटोमध्येही होणार कर्मचारी कपात

फूड डिलिव्हरी क्षेत्राचा वाढीचा दर खाली आला आहे, जो कंपनीच्या अंदाजांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. त्यामुळे कंपनीला नफ्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी कपातीचा कठीण निर्णय घ्यावा लागला. आम्ही इतर अप्रत्यक्ष खर्च जसे की पायाभूत सुविधा, कार्यालय/सुविधा इत्यादींवरील खर्चात कपात केली आहे. आम्हाला भविष्यातील अंदाजानुसार आमच्या एकूण कर्मचार्‍यांच्या कामाला योग्य किंमत देण्याचीही आवश्यकता होती. त्यामुळे या वाईट निर्णयासाठी “ओव्हरहायरिंग” जबाबदार असून आम्हाला चांगले निर्णय घ्यायला हवे होते, असंही श्रीहर्ष मजेटी यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून जगभरातील विविध नामांकित कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यात आली आहे. नुकतेच शेअर चॅट कंपनीमधून ६०० कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून कमी करण्यात आले. कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांना काढून टाकल्याने कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. शेअर चॅटच्या कर्मचारी कपातीला २४ तास उलटत नाहीत तोवर स्विगीनेही कर्मचारी कपात केली आहे. तसंच, मधल्या काही दिवसांत झोमॅटोमध्येही कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.

हेही वाचा – आर्थिक मंदीमुळे मायक्रोसॉफ्ट कंपनीतून 10 हजार कर्मचाऱ्यांची कपात

First Published on: January 20, 2023 5:14 PM
Exit mobile version