‘भारत बंद’ ला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद

‘भारत बंद’ ला राज्यभरातून संमिश्र प्रतिसाद

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्या विरोधात आज संपूर्ण देशभरात बहुजन क्रांती मोर्चातर्फे पुकरलेल्या भारत बंदला संमिश्र असा प्रतिसाद मिळाला आहे. आज सकाळपासूनच देशभारतील अनेक राज्यात भारत बंदला हिंसक स्वरूप लागल्याचे पाहायला मिळाले. शैक्षणिक संस्था, व्यापारी, छोटे दुकानदार आणि नागरिकानांही भारत बंदमध्ये सामील होण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चातर्फे आवाहन करण्यात आले होते. या बंदला महाराष्ट्रातून संमिश्र असा प्रतिसाद मिळाला असून काही ठिकाणी रास्तारोको, रेल्वेरोको अश्याप्रकारचे उग्र आंदोलन झाल्याचेही आढळले. तसेच मंगळवारी महाराष्ट्रातील व्यापारी संघटनांनी कोणत्याही बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचा ठराव केला होता. त्याचाही या बंदवर थोड्याफार प्रमाणात परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले.

ठाणे – बदलापुरात बहुजन मुक्ती मोर्चातील कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली. भारत बंदसाठी पत्रकं वाटताना पत्रकं फाडल्याचा आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप या कार्यकर्त्याने केला आहे.

पुणे – आज बंदनिमित्त पुण्यात काढलेल्या बाईक रॅलीमुळं वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त केला होता.

अहमदनगर – देशभरात बहुजन क्रांती मोर्चातर्फे पुकरलेल्या भारत बंदला अहमदनगरमध्ये मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात स्थानिक नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. यावेळी नागरिकत्व कायद्याला तीव्र विरोध करत सरकारच्या या कायद्याचा निषेध करण्यात आला होता. तसेच नगरमधील मुख्य बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला होता.

लातूर – लातूरमध्ये भारत बंदला संमिश्र असा प्रतिसाद पाहायला मिळाला. यावेळी दुकानं बंद करण्यास व्यापाऱ्यांनी नकार दिल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी लाठीमार केला.

First Published on: January 29, 2020 8:12 PM
Exit mobile version