पंतप्रधान मोदी रणगाड्यावर कसे? काँग्रेसचा सवाल

पंतप्रधान मोदी रणगाड्यावर कसे? काँग्रेसचा सवाल

भाजपच्या निवडणूक प्रचारासाठी वापरले जाणाऱ्या ‘मै भी चौकिदार हुँ’ या गाण्यावर काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे. या प्रचारगीतात पंतप्रधान मोदी यांनी रणगाड्यावर चढून केलेले चित्रिकरण हे निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उघड उल्लंघन आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे. त्यामुळे निवडणुक आयोगाने या गाण्यावर कारावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सचिव तौफिक मुल्लाणी यांनी केली आहे. मुल्लानी यांनी यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ऑनलाईन तक्रार केली आहे. आपल्या तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे की, ‘मागील दोन दिवस सोशल मीडियावर ‘मै भी चौकिदार हुँ’ हे गाणं भाजपकडून प्रसारित केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हे गाणं ट्वीट केलं आहे. या गाण्यात नरेंद्र मोदी रणगाडयावर बसलेले दिसून येतात. त्याचप्रमाणे या चित्रफितीमध्ये भारतीय लष्कराचे जवान लढताना देखील दाखवण्यात आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ९ मार्च २०१९ रोजीच्या परिपत्रकानुसार राजकीय पक्षांना प्रचारामध्ये भारतीय लष्कर आणि संबंधित प्रतिकात्मक छायाचित्रांचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तरीही त्याचं उल्लंघन करत या गाण्यामध्ये पंतप्रधानांना रणगाड्यासोबत दाखवलं आहे.’

तौफिक मुल्लाणी म्हणतात की, ‘पुलवामा दहशतवादी हल्ला झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी, याविरोधात देशाच्या प्रत्येक कृतीला आपलं समर्थन असल्याचे जाहीर केलं होतं. एकीकडे काँग्रेस पक्ष भारतीय लष्कराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असताना, दुसरीकडे देशाचे पंतप्रधान मात्र सैनिकांच्या शौर्याचे श्रेय लाटू पाहत असल्याचे यावरून दिसून येते. महागाई, बेरोजगारी, दहशतवादी हल्ले असे अनेक गंभीर प्रश्न सोडविण्यात साफ अपयशी ठरले आहे.’ ‘अशा जाहिरातींच्या माध्यमातून भारतीय लष्कराचं श्रेय लाटण्याचा निंदनीय प्रकार भाजप करत आहेत’, असा आरोपही मुल्लाणी यांनी केला आहे.

 तौफिक मुल्लाणी यांनी निवडणूनक आयोगाला लिहीलेले पत्र

 

First Published on: March 18, 2019 8:09 PM
Exit mobile version