कॉंग्रेसच्या खासदाराचा माईक तीन दिवसांपासून बंद; लोकसभा अध्यक्षांकडे केली तक्रार

कॉंग्रेसच्या खासदाराचा माईक तीन दिवसांपासून बंद; लोकसभा अध्यक्षांकडे केली तक्रार

खासदार अधीर रंजन चोधरी

नवी दिल्लीः कॉंग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांचा संसदेतील माईक तीन दिवसांपासून बंद आहे. खासदार चौधरी यांनी याची तक्रार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे.

संसदेत मी बसतो, त्या ठिकाणी असलेला माईक तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे मला चर्चेत सहभागी होता येत नाही. माझे मत मला मांडता येत नाही, असे पत्र खासदार चौधरी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना लिहिले आहे. मोदी सरकारला संसदेचे काम चालू द्यायचे नाही. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत, अशीही तक्रार खासदार चौधरी यांनी पत्रात केली आहे.

अर्थसंकल्प अधिवेशनाचे दुसरे सत्र सुरु झाल्यानंतर सरकारने स्वतःच सभागृहात गदारोळ सुरु केला. कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा हेतू तर नाही ना, असा संशय यातून निर्माण होतो. महत्त्वाचे म्हणजे केद्र सरकार मधील बडे मंत्री सभागृहात गोंधळ घालायला पुढे होते, असे खासदार चौधरी यांनी पत्रात नमूद केले आहे.

विरोधी पक्षाला त्यांचे मत मांडण्याची संधी दिली जात नाही. सभागृहात मी ज्या ठिकाणी बसतो तेथील माईक तीन दिवस झाले बंद आहे. परिणामी खासदार राहुल गांधी यांच्यावर होणाऱ्या आरोपांचे मला उत्तर देता येत नाही. माझी नम्र विनंती आहे की विरोधी पक्षालाही त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणी खासदार चौधरी यांनी पत्रात केली आहे.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रातील दुसऱ्या दिवशीही लोकसभेचे कामकाज सुरू होताच राहुल गांधींनी परदेशात केलेल्या वक्तव्यामुळे गदारोळ झाला. राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, पियुष गोयल आणि केंद्रीय संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह अनेक खासदारांनी राहुल गांधींनी सभागृहात येऊन माफी मागावी, अशी मागणी केली. यामुळे संसदेचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. तर कॉंग्रेस खासदारांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यांचे समर्थन केले.
First Published on: March 15, 2023 11:01 PM
Exit mobile version