‘रफाल प्रकरणी चौकीदाराच्या चोरीचा पुरावा देशासमोर’

‘रफाल प्रकरणी चौकीदाराच्या चोरीचा पुरावा देशासमोर’

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोदींचा मुखवटा उतरला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारपासून बरेच काही लपविले होते. मात्र न्यायालयाच्या आजच्या निर्णयानंतर चौकीदाराने केलेल्या चोरीचा पुरावा देशासमोर आला आहे. आता तपास होईल आणि चौकीदार व त्याच्या सहकऱ्यांना शिक्षाही मिळेल, आता न्याय होईल, अशी प्रतिक्रिया कॉँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.

राफेल विमान खरेदीमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला मोठा झटका बसला आहे. सुप्रीम कोर्टाने राफेल प्रकरणाची पुन्हा सुनावणी घेण्याला मान्यता दिली आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली संरक्षण खात्यासंदर्भातली कागदपत्र सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून त्या आधारावर या प्रकरणाची पुन्हा सुनावणी घेतली जाणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून केला गेलेला विशेषाधिकाराचा दावा अमान्य करत फेटाळून लावला.

राफेल विमान खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केंद्रात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने केला होता. तसेच, राफेल विमान खरेदीवेळी हवाई दलाच्या बार्गेनिंग टीमसोबतच खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच फ्रान्सशी समांतर वाटाघाटी चालवल्या होत्या, असा खळबळजनक आरोप काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी थेट संरक्षण खात्यातील हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची सही असलेली कागदपत्र खुल्या पत्रकारपरिषदेमध्ये जाहीर देखील केली होती. त्यामुळे या प्रकरणावर मोठी चर्चा सुरू झाली होती.

First Published on: April 10, 2019 1:57 PM
Exit mobile version