उद्या ठरणार काँग्रेसचा अध्यक्ष; पण पक्षावर गांधी कुटुंबाचाच राहणार वरचष्मा

उद्या ठरणार काँग्रेसचा अध्यक्ष; पण पक्षावर गांधी कुटुंबाचाच राहणार वरचष्मा

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी पार पडली. उद्या, १९ ऑक्टोबरला आता निकाल जाहीर होऊन तब्बल २४ वर्षांनी बिगर गांधी कुटुंबातील काँग्रेसला अध्यक्ष मिळणार आहे. परंतु, काँग्रेस पक्षात गांधी कुटुंबाचा प्रभाव कायम राहणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. पक्षाचे नवे अध्यक्ष रिमोट कंट्रोल नसतील. तर त्यांच्यावर गांधी कुटुंबाचा वरचष्मा असणार असल्याचं काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून सांगण्यात येतंय.

हेही वाचा…म्हणून बिल्किस बानो प्रकरणातील दोषींची मुक्तता, गुजरात सरकारचा सुप्रीम कोर्टासमोर खुलासा

दरम्यान, मलिल्कार्जून खर्गे आणि शशी थरुर यांच्यात अध्यक्षपदाची लढत झाली. काल एकूण ९६ टक्के मतदान पार पडलं. उद्या निकाल हाती येणार आहे. या निकालात कोणाची बाजी लागणार आणि कोण अध्यक्षपदी विराजमान होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी कारभार पाहत होत्या. मात्र, त्यांच्या प्रकृतीवस्थामुळे त्यांना हे पद सोडायचं आहे. तर, राहुल गांधी हे अध्यक्षपदासाठी इच्छुक नाहीत. त्यामुळे २४ वर्षांनी या पदासाठी निवडणूक पार पडली. परंतु, लोकशाही मार्गाने निवडणूक पार पडली असली तरी या पक्षावर गांधी कुटुंबाचा प्रभाव कायम राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे गांधी घराण्याचा आवाज कमी होणार नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी म्हटले आहे. नेतृत्वाचे व्हिजन कसे पुढे न्यायचे आणि त्याची अंमलबजावणी कशी करायची हे पक्षाचे नवे अध्यक्ष ठरवतील, असं सलमान खुर्शीद म्हणाले.

हेही वाचा – ‘मी तेव्हा निवडणूक जिंकलो असतो’… काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबाबत शरद पवारांचा मोठा खुलासा

गांधी घराण्याचं मोठं योगदान

कार्यकर्त्यांचा कल गांधी घराण्याकडेच राहील, कारण त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सोनिया गांधी रामविलास पासवान यांच्या घरी, लालू प्रसादजींच्या घरी जाऊन, यूपीएची स्थापना कशी झाली हे तुम्ही विसरलात. जे लोक पक्षापासून कुटुंब वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना यात यश मिळणार नाही. मला आशा आहे की सोनिया गांधी मार्गदर्शकाच्या भूमिकेत किंवा अन्य कोणत्या तरी भूमिकेत पक्षासाठी काम करत राहतील, असं ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी म्हणाल्या. गांधी घराण्याचा इतिहास खूप जुना आहे. त्यांनी खूप त्याग केला आहे. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे बलिदान कोणीही विसरू शकत नाही. त्यांनी देशासाठी खूप योगदान दिले आहे. गांधी घराण्याची महत्त्वाची भूमिका राहील. सोनिया गांधी अध्यक्षपदावरून दूर होणार आहेत. पण त्या आमच्या नेत्या होत्या आणि यापुढेही राहतील. त्यांची प्रेरणा आणि मार्गदर्शनासाठी आम्ही त्यांच्याकडे पाहत राहू. राहुल गांधींनी काँग्रेसचे नेतृत्व केले. त्यांचे मार्गदर्शनही आमच्यासाठी मोलाचे ठरेल, असंही सोनी म्हणाल्या.

हेही वाचा – गुजरातमध्ये ‘आप’चंच सरकार येणार, अरविंद केजरीवालांनी सादर केला गुप्तचर विभागाचा अहवाल

काँग्रेसचं रक्त आमच्या डीएनएमध्ये

गांधी घराणे गेल्या एक शतकापासून काँग्रेसशी संबंधित असून त्यांचे रक्त आमच्या डीएनएमध्ये आहे, असं अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरुर म्हणाले. तर मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, मी अध्यक्ष झालो तरी पक्षाच्या कारभारात गांधी घराण्याचा सल्ला आणि सहकार्य घेण्यास मला लाज वाटणार नाही. कारण या कुटुंबाने पक्षाच्या विकासासाठी संघर्ष केला आणि ताकद पणाला लावली. सोनिया गांधी यांनी 20 वर्षे संघटनेत काम केले आहे. राहुल गांधीही अध्यक्ष होते. त्यांनी पक्षासाठी लढा दिला आणि पक्षाच्या प्रगतीसाठी आपली ताकद वापरली.

खर्गे म्हणाले की, काही निवडणुका आम्ही (काँग्रेस) हरलो म्हणून गांधी घराण्याच्या विरोधात बोलणं योग्य नाही. कोण कुठे आहे आणि पक्षासाठी काय करू शकतो, हे सोनिया आणि राहुल गांधींना चांगलं माहित आहे. पक्षात एकजुटीसाठी काय करायचे ते मला शिकावे लागेल आणि मी ते करेन.

First Published on: October 18, 2022 9:29 AM
Exit mobile version