मी गांधी कुटुंबीयांच्या विरोधात नाही, पण अध्यक्षाविना राष्ट्रीय पक्ष कसा चालू शकतो?

मी गांधी कुटुंबीयांच्या विरोधात नाही, पण अध्यक्षाविना राष्ट्रीय पक्ष कसा चालू शकतो?

बिहार विधानसभा निवडणूक आणि देशातील इतर राज्यांमधील पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवावरुन काँग्रेसमध्ये खदखद सुरु आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी निवडणुकीतील पराभव आणि पक्षनेतृत्वावर सवाल उपस्थित केले. त्यानंतर पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या काही नेत्यांनी पुन्हा एकदा सिब्बल यांच्यावर पलटवार केला. कपिल सिब्बल यांनी पक्षातील अंतर्गत विषय बाहेर बोलायला नको होते अस म्हणत काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर कपिल सिब्बल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपण गांधी कुटुंबीयांविरोधात नसल्याचे कपिल सिब्बल म्हणाले. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले आहे.

मी गांधी कुटुंबीयांच्या विरोधात नाही, पण अध्यक्षाविना राष्ट्रीय पक्ष कसा चालू शकतो? असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला आहे. “राहुल गांधी यांनी दीड वर्षांपूर्वी आपल्याला काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहायचे नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच त्या पदी गांधी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती असू नये असेही ते म्हणाले होते. या गोष्टीला दीड वर्ष उलटल्यानंतरही मी हे विचारू इच्छितो की कोणताही राष्ट्रीय पक्ष विना अध्यक्ष एवढ्या मोठ्या कालावधीसाठी काम कसा करू शकतो. मी पक्षाच्या आत यावर आवाज उचलला होता. आम्ही ऑगस्ट महिन्यात पत्रही लिहिले होते. परंतु आमच्याशी कोणीही चर्चा केली नाही. दीड वर्षांनंतरही आमच्या पक्षाला अध्यक्ष नाही. कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या कोणाकडे मांडाव्या?,” असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला आहे.

“एखाद्या राष्ट्रीय पक्षासाठी ही कठिण परिस्थिती आहे. मी कोणाच्याही क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाही. फक्त पक्षात निवडणुका व्हाव्यात एवढेच म्हणणे आहे. जर आम्ही संघटनेच्या निवडणुका घेतल्या नाही तर आम्हाला जो हवा तसा निकाल इतर ठिकाणी कसा मिळेल. हेच आम्ही पत्रातही नमूद केले होते,” असे सिब्बल म्हणाले. “पक्षाला कोणीही अध्यक्ष नाही. आम्ही ऑगस्ट २०२० मध्ये जे पत्र लिहिले ते आमचे तिसरे पत्र होते. गुलाम नबी आझाद यांनी त्याआधी दोन वेळा पत्र लिहिले होते. परंतु त्यानंतरही आमच्याशी कोणी चर्चा केली नाही. म्हणूनच मला जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी माझे म्हणणे मांडले,” असे कपिल सिब्बल म्हणाले.

 

First Published on: November 21, 2020 9:38 AM
Exit mobile version