कोरोनाच्या आधी घेतलेले शुल्क परत करा; दिल्ली ग्राहक मंचचे कोचिंग क्लासला आदेश

कोरोनाच्या आधी घेतलेले शुल्क परत करा; दिल्ली ग्राहक मंचचे कोचिंग क्लासला आदेश

संग्रहित छायाचित्र

 

नवी दिल्लीः कोरोनाच्या आधी घेतलेल्या शुल्कातील काही रक्कम परत करण्याचे आदेश दिल्ली ग्राहक मंचने तेथील कोचिंग क्लासला दिले आहेत. ग्राहक मंचचे अध्यक्ष इंद्रजित सिंग यांनी हे आदेश दिले. कोरोनाचे संकट अनपेक्षित होते. पण कोचिंग क्लासला प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी शुल्क घेण्यात आले होते. त्या शुल्काच्या आधारावर ऑनलाईन क्लासची सक्ती केली जाऊ शकत नाही, असा निर्वाळा ग्राहक मंचने दिला आहे.

कोरोनामुळे ऑनलाईन कोचिंगचा पर्याय सुरु करण्यात आला. मात्र यासाठी विद्यार्थ्यांची परवानगी घेणे आवश्यक होते. ऑनलाईन क्लासेसची सक्ती करणे अयोग्य आहे, असेही ग्राहक मंचने निकालात नमूद केले आहे. कोचिंग क्लासने १ लाख १३२ रुपयांंचे शुल्क परत करावे. तसेच अर्जदाराला झालेल्या मानसिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून पाच हजार रुपये अतिरिक्त द्यावेत, असे आदेश ग्राहक मंचने दिले.

याप्रकरणी दिल्ली येथील स्नेहपाल सिंग यांनी ग्राहक मंचकडे अर्ज केला होता. सिंग वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत त्यांनी हा अर्ज केला. कोचिंग क्लाससाठी १ लाख १६ हजार ८२० रुपये सिंग यांनी भरले होते. सात महिन्यांच्या कोचिंगसाठी हे पैसे भरले होते. कोरोनामुळे अचानक लॉकडाऊन सुरु झाला. त्यानंतर क्लास झालाच नाही. त्यामुळे सिंगने दिल्लीतून मुळ गावी जाण्याआधी कोचिंग क्लासकडे शुल्काची रक्कम परत मागितली. कोचिंग क्लासने त्यांच्यासमोर ऑनलाईन क्लासचा पर्याय ठेवला. त्यास त्यांनी नकार दिला व शुल्क परत मागितले.

कोचिंग क्लासने शुल्क देण्यास नकार दिला. शुल्काची परतफेड करण्याचे आमचे कोणतेच धोरण नाही. तसे कोचिंग क्लासच्या माहिती पुस्तकात नमूद आहे. सिंग यांनी चुकीच्या पद्धतीने प्रवेश रद्द केला आहे. कोरोनामुळे कोचिंग क्लास बंद करण्यात आला होता. त्यामुळे शुल्काची परतफेड करता येणार नाही, असा दावा कोचिंग क्लासच्यावतीने करण्यात आला.

कोचिंग क्लासची शुल्क परतफेड करण्याचे धोरण नाही. मात्र तसे त्यांनी सिंग यांना केलेल्या मेलमध्ये नमूद केलेले नाही. आप्तकालीन परिस्थितीमुळे कोचिंग क्लास शुल्क परत करत नाही. पण सिंग यांनी कोणत्याच नियमाचा भंग केलेला नाही. त्यामुळे सिंग यांचे पारडे जड आहे, असे ग्राहक मंचने आदेश देताना नमूद केले.

कोरोनाचा प्रभाव इंटरनेट सेवेवरही झाला होता. त्यामुळे ऑनलाईन क्लासवर त्याचा परिणाम झाला होतो. ऑनलाईन क्लासला अनेक अडचणी येत होत्या, हा सिंग यांचा दावाही ग्राहक मंचने मान्य केला. कोचिंग क्लासने ऑनलाईन क्लाससाठी शुल्क घेतले नव्हते. कोरोना काळात इंटरनेट सेवा सुरळीत नव्हती. कोचिंगवर त्याचा परिणाम होत होता हे सत्य आहे, असे मतही ग्राहक मंचने व्यक्त केले.

 

First Published on: February 4, 2023 3:53 PM
Exit mobile version