कोरोना संकटावर संयुक्त राष्ट्राला वेगळीच भिती, म्हणे हे संकट रूप बदलतंय!

कोरोना संकटावर संयुक्त राष्ट्राला वेगळीच भिती, म्हणे हे संकट रूप बदलतंय!

जगभरात कोरोना व्हायरसमुळे अक्षरश: हाहा:कार माजला आहे. आत्तापर्यंत या विषाणूने एक लाखाहून अधिक लोकांचे जगभरात बळी घेतले आहेत. त्याशिवाय, अनेक ठिकाणी लाखो नागरिकांना व्हायरसने संक्रमित केले आहे. त्यामुळे या जागतिक महामारीतून वाचण्यासाठी शक्य तितक्या लवकर लस शोधली जावी, अशीच मनोमन प्रार्थना सध्या जगाच्या कानाकोपऱ्यात केली जात आहे. सगळं जग लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग या दोनच नियमांवर बोलत आहे आणि त्याची अंमलबजावणी करत आहे. अशा सगळ्या गोंधळात जागतिक आरोग्य संघटनेने एकीकडे कोरोना व्हायरस दीर्घकाळ आपल्यासोबत राहणार आहे, त्याची तयारी ठेवा असं भाकित वर्तवलेलं असतानाच संयुक्त राष्ट्राने (UN) मात्र वेगळीच भिती व्यक्त केली आहे!

सामाजिक तेढ, भेदभाव आणि मानवाधिकारांचं हनन!

जागतिक आरोग्य संघटनेने अर्थात डब्ल्यूएचओने कोरोनाचं संकट इतक्यात संपणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र, संयुक्त राष्ट्रांना या संकटाचं रूप बदलत असल्याचा धोका दिसू लागला आहे. ‘कोरोना व्हायरस हे आत्तापर्यंत एक मानवी संकट होतं. पण आता वेगाने त्याचं मानवाधिकार संकटात रुपांतर होऊ लागलं आहे’, असा गंभीर इशारा संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटारेस यांनी दिला आहे. ‘या घडीला आपण गेल्या कित्येक पिढ्यांमध्ये दिसलं नाही अशा संकटाचा सामना करत आहोत. पण असं असताना देखील कोरोनाविरोधातल्या लढ्यामध्ये अनेक ठिकाणी जीवनावश्यक सेवांची पूर्तता करण्यामध्ये भेदभाव केला जात आहे. या महामारीचा काही समाजांवर विपरीत परिणाम होत आहे. सामाजिक तेढ निर्माण करणारे आक्षेप वाढले आहेत. संवेदनशील समाजघटकांवरचे हल्ले वाढले आहेत’, असं गुतारेस म्हणाले आहेत.

‘काही देशांमध्ये कट्टरतावाद, लोकानुनयी निर्णय प्रक्रिया, निरंकुशता आणि मानवाधिकाराचं हनन होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या साथीव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये सक्ती करण्याची संधी शोधली जात आहे’, असं देखील गुतारेस यांनी नमूद केलं आहे.

जग कोरोनाच्या विळख्यात!

जगातल्या बहुतांश देशांना कोरोनाने आत्तापर्यंत आपल्या विळख्यात घेतलं आहे. एकूण २६ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून १ लाख ८० हजारहून जास्त रुग्णांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. या व्हायरसचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून तिथे आत्तापर्यंत ४० हजाराहून जास्त लोकांचा मृत्यू झाला असून लाखो लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याशिवाय युरोपमध्ये देखील कोरोनाने मोठ्या प्रमाणावर लोकांना संक्रमित केलं आहे.

First Published on: April 24, 2020 9:12 AM
Exit mobile version