एकही चूक करू नका, कोरोना दीर्घकाळ राहणार आहे – WHO

एकही चूक करू नका, कोरोना दीर्घकाळ राहणार आहे – WHO

कोरोनाचा जगभरात वेगाने फैलाव होत असताना अनेक देश लॉकडाऊनच्या मदतीने कोरोनाशी लढा देण्याचा प्रयत्न करत आहेत. जगभरात कोरोनामुळे २५ लाखाहून जास्त रुग्ण बाधित झाले असताना किमान दीड लाख लोकं मरण पावले आहेत. पण डब्ल्यूएचओ अर्थात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने नुकत्याच दिलेल्या इशाऱ्यानुसार, अजून कोरोनाचा भीषण काळ यायचा आहे. यातून जगाने पुरेसा बोध घेण्याआधीच जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जगभरातल्या राष्ट्रप्रमुखांना नवा इशारा दिला आहे. ‘एकही चूक करू नका. आपल्याला अजून कोरोनाशी दीर्घकाळ लढा द्यायचा आहे. अजून खूप काळ कोरोना आपल्यासोबत राहणार आहे. त्यामुळे जे काही नियोजन कराल, ते दीर्घकाळासाठी करा’, असं डब्ल्यूएचओचे संचालक डॉ. टेड्रॉस अधानोम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे!

भारतात येत्या ३ मे रोजीपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. जिथे कोरोनाचा प्रभाव नाही, अशा ठिकाणी काही अटींवर काही क्षेत्रांमधले नियमित व्यवहार सुरू देखील करण्यात आले आहेत. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या या इशाऱ्यामुळे ३ मेनंतर खरंच लॉकडाऊन उठणार का? आणि काही भागांमध्ये अटींमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय योग्य आहे का? असे प्रश्न महत्त्वाचे ठरणार आहेत.

कोरोना पुन्हा उसळून वर येतोय!

डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार, ज्या देशांनी लॉकडाऊनच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा नियंत्रणात आणला होता, तिथे कोरोना पुन्हा उसळून वर येतोय. कारण लोकसंख्येचा एक मोठा हिस्सा हा अजूनही कोरोनाची लागण होण्यासाठी संवेदनशील आहे. आणि तो तसाच राहणार आहे. उत्तर अमेरिका आणि युरोपसारख्या भागामध्ये तर कोरोनाचा प्रादुर्भाव भीषण पद्धतीने वाढू लागला आहे. जोपर्यंत कोरोना व्हायरस जगात आहे, तोपर्यंत त्याचा प्रादुर्भाव पुन्हा पुन्हा होण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव शून्यापर्यंत आणणं प्रचंड कठीण काम आहे. त्यामुळे प्रत्येक देशाला याची काळजी घ्यावी लागेल, की कोरोनाचा प्रादुर्भाव संपवण्यापेक्षाही त्याचा प्रभाव कमी कमी कसा करता येईल.

आता पूर्वीसारखं काही राहणार नाही!

यावेळी बोलताना टेड्रॉस यांनी एक महत्त्वपूर्ण आणि गंभीर इशारा दिला आहे. ‘गेल्या अनेक दिवसांपासून अनेक देशांमधली लोकं लॉकडाऊनमुळे घरातच राहत आहे. पण त्यांच्यात आता अस्वस्थता वाढू लागली आहे. लोकांना त्यांचं पूर्वीसारखं आयुष्य पुन्हा जगायचं आहे. पण आता जग पुन्हा पूर्वीसारखं राहणार नाही. सामान्य परिस्थितीच्या व्याख्याच पूर्णपणे बदलून जातील. आता सामान्य असलेली परिस्थिती ही पूर्वीपेक्षा खूप वेगळी असेल’, असं ते म्हणाले.

खात्री कशाचीच नाही!

दरम्यान, यावेळी जागतिक आरोग्य संघटनेनं हे स्पष्ट केलं आहे की आजपर्यंत अशी कोणतीही चाचणी शोधण्यात आलेली नाही की ज्यात हे स्पष्ट होऊ शकेल की समोरच्या व्यक्तीमध्ये प्रतिकारशक्ती पुरेशी आहे. शिवाय, एकदा बऱ्या झालेल्या रुग्णाला पुन्हा कोरोनाची लागण होणारच नाही किंवा त्याच्या शरीरात मृत झालेला कोरोना पुन्हा अॅक्टिव्हेट होणारच नाही, याची कोणतीही खात्री नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबईला भेट दिलेल्या केंद्रीय पथकानं वर्तवलेले अंदाज मुंबईकरांना धडकी भरवणारे आहेत. पण जगभरातल्या कोरोनाग्रस्तांबद्दल WHOनं वर्तवलेलं हे भाकित फक्त भाकित नसून हातातल्या आकडेवारीनुसार दिलेली सत्य माहिती आहे. या परिस्थितीमध्ये अजूनही कोणतंही गांभीर्य न दाखवता रस्त्यांवर भटकणाऱ्यांनी किमान जागतिक आरोग्य संघटनेचं तरी ऐकावं, अशी अपेक्षा या इशाऱ्यानंतर तरी पूर्ण होईल का? हाच प्रश्न प्रशासनाला पडला असावा!

First Published on: April 23, 2020 9:14 AM
Exit mobile version