दिलासादायक! देशात गेल्या २४ तासात कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ

दिलासादायक! देशात गेल्या २४ तासात कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येत वाढ

गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाचा कहर सुरू आहे. देशात कोरोना संसर्गाला सुरुवात झाल्यापासून दिवसेंदिवस बाधितांच्या आकड्यात वाढ होताना दिसतेय. सोमवारी देशात १ लाख ६८ हजारांहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली तर गेल्या २४ तासात आज १ लाख ६१ हजारांहून अधिक नवे रूग्ण आढळ्याचे समोर आले आहे. असे असले तरी दिलासादायक बाब म्हणजे सोमवारच्या तुलनेत आज कोरोनावर मात करण्याच्या संख्येत वाढ झाली असून गेल्या २४ तासात ९७ हजार १६८ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या २४ तासांत झालेली रुग्णवाढ आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली. यानुसार देशात गेल्या २४ तासात १ लाख ६१ हजार ७३६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आतापर्यंत बाधितांचा आकडा १ कोटी ३६ लाखांवर पोहोचला आहे. तर या कालावधीत देशात ८७९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १ लाख ७१ हजार ५८ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशात सध्या १२ लाख ६४ हजार ६९८ जणांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. या चिंताजनक वातावरणात दिलासादायक म्हणजे आतापर्यंत १ कोटी २२ लाख ५३ हजारांहून अधिकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे.

देशात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे देशात वेगाने लसीकरण मोहीम सुरू आहे. देशात आतापर्यंत एकूण १० कोटी ८५ लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. तर देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्र आढळून येत असल्याने महाराष्ट्राप्रमाणे इतर राज्यांमध्येही कोरोना स्थिती गंभीर होत आहे. याचपार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह दिल्लीमध्येही लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


 

First Published on: April 13, 2021 10:05 AM
Exit mobile version