कोरोनाची दुसरी लाट भयंकर, आता घरातही मास्क लावण्याची वेळ

कोरोनाची दुसरी लाट भयंकर, आता घरातही मास्क लावण्याची वेळ

देशात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला आहे. केंद्र सरकारने तर कोरोनाची ही दुसरी लाट अत्यंत भयंकर असून आता घरातही मास्क लावण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे स्पष्ट होत आहे. केंद्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरून देशवासीयांना सावध केले आहे. कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर आहे. त्यामुळे आता घरातही मास्क लावण्याची वेळ आली आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

महिलांनी मासिक पाळीत लस घेऊ नये, त्यामुळे रिअ‍ॅक्शन होण्याची शक्यता असते. अशा आशयाचे मेसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरही केंद्राने स्पष्टीकरण दिले आहे. मासिक पाळीतही महिला इंजेक्शन घेऊ शकतात. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे, असे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑक्सिजन टँकर्समध्ये जीपीएस लावण्यात आले आहेत. या टँकर्सची सरकार मॉनिटरिंग करत आहे. शक्य तितक्या लवकर रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन हे संजीवनी नाही. रेमडेसिवीरला रामबाण औषध किंवा संजीवनी आहे, असे मानण्याचे कारण नाही. तो तुमचा गैरसमज असेल. त्यामुळे या इंजेक्शनचा साठा करणे योग्य नाही. कोरोनाच्या संसर्गाच्या सुरुवातीला रेमडेसिवीर घेतल्याने काहीही फायदा होत नाही. सौम्य लक्षणे असतील तर इतर सपोर्टिव्ह ट्रिटमेंटनेही रुग्ण बरा होतो. काढा, घरगुती उपाय, वाफ घेणे, गुळणी करणे आदी गोष्टी केल्यानेही कोरोनाची सौम्य लक्षणे असलेला रुग्ण बरा होतो. त्यामुळे पॅनिक होऊ नका, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

ऑक्सिजनसाठी काय कराल?
देशात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशावेळी नागरिकांनी आणि रुग्णांनी पोटावर झोपून श्वसनाचा व्यायाम करावा, अशी सूचनाही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे.

First Published on: April 27, 2021 4:15 AM
Exit mobile version