कोरोनाच्या जन्मदात्या चीनलाही भारताने मागे टाकले, सर्वाधिक रुग्णसंख्येत ९ वा क्रमांक

कोरोनाच्या जन्मदात्या चीनलाही भारताने मागे टाकले, सर्वाधिक रुग्णसंख्येत ९ वा क्रमांक

देशात चार वेळा लॉकडाऊन करुन सुद्धा कोरोनाचा कहर काही थांबलेला नाही. सर्वाधिक रुग्णसंख्येच्या तक्त्यामध्ये भारत आता नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर मृत्यू आणि रुग्णसंख्येत भारताने कोरोनाच्या जन्मदात्या चीनला मागे टाकले आहे. कोरोना व्हायरसच्या जागतिक आकडेवारीसाठी प्रसिद्ध असलेल्या ncov2019.live संकेतस्थळावर सविस्तर आकडेवारी देण्यात आली आहे. भारतात सध्या १ लाख ६५ हजार ७९९ रुग्ण आढळले आहेत. तर मृतांची संख्या ४,७११ वर पोहोचली आहे. तर चीनची रुग्णसंख्या ८२,९९५ असून मृत्यूचा आकडा ४,६३४ इतका आहे.

चीनच्या वुहान प्रांतात डिसेंबर महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरु झाला होता. त्यानंतर जानेवारी महिन्यात कोरोना व्हायरसचे संक्रमण इतर देशांमध्ये व्हायला सुरुवात झाली. पाहता पाहता फेब्रुवारी महिन्यापर्यंत जगातील बहुतेक देशांमध्ये कोरोनाने शिरकाव केला होता. मात्र मार्च महिन्यात चीनने कोरोनावर नियंत्रण आणण्यास यश मिळवले होते. वुहान प्रातांच्या बाहेर कोरोनाला पसरू न देण्यात चीनला यश प्राप्त झाले होते. त्यामुळे चीनमध्ये कोरोना व्हायरसचा आकडा वाढलेला दिसत नाही. एवढ्या दिवसांत चीनची रुग्णसंख्या ही केवळ ८३ हजारापर्यंत सीमित राहिली, हे विशेष.

जागतिक आकडेवारी

दुसरीकडे, कोरोना व्हायरसचे गांभीर्य नसल्यामुळे इटली, अमेरिका सारख्या देशांना याचा मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनचे तंतोतंत पालन न केल्यामुळे या देशांमध्ये रुग्ण आणि मृतांच्या संख्येत वाढच होत राहिली. आज जगभरात ५९ लाख कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी ३ लाख ६२ हजार रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सर्वाधिक १७ लाख ५८ हजार रुग्ण हे एकट्या अमेरिकेत आहेत. तर सर्वाधिक मृत्यूंची संख्या १ लाख २ हजार ही अमेरिकेतच आहे.

इटलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची आणि मृतांची संख्या कमी होत चालली आहे. इटलीमध्ये २ लाख ३१ हजार रुग्ण असून त्यापैकी ३३,१४२ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर ब्रिटनमध्ये रुग्णसंख्येत वाढ होत चालली आहे. ब्रिटनमध्ये एकूण २ लाख ६९ रुग्ण असून मृतांचा आकडा ३७ हजार ८३७ वर पोहोचला आहे.

First Published on: May 29, 2020 10:52 AM
Exit mobile version