गुजरातचे न्यायमूर्ती म्हणतात, गोहत्या थांबल्यास जगातील समस्या होतील दूर!

गुजरातचे न्यायमूर्ती म्हणतात, गोहत्या थांबल्यास जगातील समस्या होतील दूर!

अहमदाबाद – गायीच्या शेणापासून बनलेल्या घरांचं न्युक्लिअर रेडिएशनपासून संरक्षण होतं. ज्यादिवशी गोहत्या थांबेल त्या दिवशी जगातील सर्व समस्या दूर होतील, असं गुजरातमधील एका न्यायालायने गायींच्या तस्करीविरोधातील आदेशात म्हटलं आहे. गायींची अवैध वाहतूकप्रकरणी ही सुनावणी सुरू होती. याप्रकरणी मोहम्मद अमीन या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (All of earth’s problems will get solved the day cow slaughter ends, a court in Gujarat observed)

तापी जिल्ह्यांतील सत्र न्यायालायातील न्यायाधीश एस.वी.व्यास यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे की, गाय फक्त प्राणी नाहीय. ती आईसुद्धा आहे. म्हणूनच आपण तिला गोमाता म्हणतो. गायींमुळे संपूर्ण ब्रम्हांडाला मिळणाऱ्या लाभांचं आपण वर्णन करू शकत नाही. ज्यादिवशी गायीच्या रक्ताचा थेंब जमिनीवर सांडणे बंद होईल त्यादिवशी जगातील सर्व समस्या नष्ट होतील आणि जगाचं कल्याण होईल. हा निर्णय गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये गुजराती भाषेत देण्यात आला होता. या आदेशाचा आता इतर प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. गोहत्या आणि तस्करीच्या घटना समाजासाठी अपमानजनक आहेत, असंही न्यायमूर्तींनी पुढे स्पष्ट केलं.

दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र आदी विविध गायींच्या उत्पादनांचं महत्त्वही न्यायमूर्तींनी विषद केलं. सध्याच्या रासायनिक शेतीच्या युगात नैसर्गिक शेती म्हणजेच गायीवर आधारित शेतीची लोकप्रियता वाढत आहे, असंही न्यायमूर्ती म्हणाले.

नैसर्गिक शेतींपासून तयार झालेले उत्पन्न अनेक आजारांपासून मानवाचं संरक्षण करतात. विज्ञानाने सिद्ध केलं आहे की गायीच्या शेणापासून बनवलेल्या घरांवर न्युक्लिअर रेडिअशनचा प्रभाव पडत नाही. गोमूत्रच्या सेवनापासून अनेक आजार बरे होतात. गाय धर्माचं प्रतिक आहे. जगभरात ज्या काही समस्या आहेत त्या गोहत्या होत असल्यामुळे उद्भवल्या आहेत, असंही न्यायमूर्ती म्हणाले.

आरोपी अमीनविरोधात १८ जुलै २०२० रोजी कारवाई झाली होती. तो १६ गायी आणि बैलांची तस्करी करून तापीहून महाराष्ट्रात घेऊन जात होता. त्यावेळी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तापी आणि बनासकांठा जिल्ह्यांतील चौकातून त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. कोणत्याही प्राथमिक उपचारांच्या किटशिवाय या प्राण्यांची वाहतूक सुरू होती. गाडीमध्ये पाणी, चारा आणि वैद्यकीय उपकरणे अस्तित्वात नव्हती. एवढंच नव्हे तर ज्या प्राण्यांची वाहतूक सुरू होती त्यामध्ये एक गाय आणि एक बैल मृतावस्थेत होता. त्यामुळे अमीनला ऑगस्ट २०२० मध्ये याप्रकरणी अटक करण्यात आली.

First Published on: January 24, 2023 1:07 PM
Exit mobile version