अमेरिकी अर्थव्यवस्था धोक्यात! कच्च्या तेलाच्या किंमती शून्याच्या खाली, फुकटही कुणी नेईना!

अमेरिकी अर्थव्यवस्था धोक्यात! कच्च्या तेलाच्या किंमती शून्याच्या खाली, फुकटही कुणी नेईना!

आत्तापर्यंत जगभरातल्या अर्थव्यवस्थांवर कोरोनाचा किती परिणाम होईल किंवा होतोय याचे फक्त आकडे दिले जात होते. त्यातून विकसनशील देशांसोबतच विकसित देशांच्या जीडीपीवर देखील कोरोनाचा परिणाम होण्याचे आडाखे बांधले गेले. मात्र, पहिल्यांदाच कोरोनाच्या अर्थव्यवस्थेवरचा थेट परणाम दिसून आला आहे. आणि तो भीषण असा आहे. कोरोनाच्या जागतिक संकटामुळे कच्च्या तेलाच्या किंमती थेट शून्याच्या खाली उतरल्या आहेत. म्हणजे प्रति बॅरल कच्च्या तेलाची किंमत थेट वजा १.९८ डॉलर प्रति बॅरल इतकी खाली आली आहे. याचाच अर्थ, जर तुम्ही कच्चं तेल खरेदी करत असाल, तर त्यासोबत तुम्हालाच उलट उत्पादकाला पैसे द्यावे लागतील! पण हे नक्की झालं कसं?

खरंतर आजपर्यंतच्या इतिहासात कच्च्या तेलाच्या किंमती इतक्या खाली कधीही आल्या नव्हत्या. पण सोमवारी मात्र, त्या थेट शून्याच्या खाली उतरल्या. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सध्याच्या लॉकडाऊनच्या काळाच जगभरातले उद्योगधंदे बंद असल्यामुळे आणि लोकं घरातच असल्यामुळे इंधन म्हणून तेलाची मागणीच घटली आहे. त्यामुळे सौदी अरेबियामध्ये तेलाचे प्लांट असलेल्या अमेरिकी कंपन्यांकडे तेलाची मागणीच येईनाशी झाली. त्याचा थेट परिणाम तेलाच्या साठवणुकीवर झाला.

आजघडीला जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी एकूण १६० कोटी बॅरल साठवण्याची क्षमता आहे. जगभरातल्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये तेलाचं उत्पादन याहून जास्त होतं. पण तेलाची मागणी ही पुढच्या महिन्याभरासाठी आगाऊ केली जाते. त्यामुळे खरेदीदार या तेल कंपन्यांकडून महिन्याभराचं तेल आगाऊ खरेदी करतो. त्यामुळे जगाची १६० कोटी बॅरल तेल साठवण्याची क्षमता योग्य प्रकारे वापरली जात होती. ती अपुरी पडत नव्हती. मात्र, आता परिस्थिती अशी झाली आहे की तेलाचं उत्पादन धडाक्यात सुरू असून त्याची मागणी मात्र घटली आहे. त्यामुळे आता उत्पादकांना असे खरेदीदार हवेत जे प्रत्यक्ष तेल साठ्यातून घेऊन जातील. पण खरेदीदार नसल्यामुळे तेल तसंच पडून राहात आहे. शेवटी तेलाच्या किंमती घटायला सुरुवात झाली.

या महिन्याच्या सुरुवातीलाच ओपेक या तेल उत्पादकांच्या संघटनेने जागतिक तेल उत्पादनामध्ये दर दिवसाला १० लाख बॅरल कमी उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तेलाची मागणी इतकी कमी झाली आहे की १० लाख बॅरल उत्पादन कमी करून त्यात काहीही फरक पडला नाही. परिणामी तेलाची किंमत अजूनच कमी करावी लागली. सरतेशेवटी ती कमी होत होत सोमवारी थेट शून्य डॉरलच्याही खाली गेली. काही कंपन्यांनी तर ती उणे ३९ डॉरल प्रति बॅरल इतकी खाली देखील आणली! खरेदीदारांशी तेल उत्पादक कंपन्यांनी केलेल्या करारानुसार मंगळवारपर्यंत साठ्यांमधून तेल उचलणं आवश्यक होतं. मात्र, सोमवारीच यातल्या अनेक खरेदीदारांनी काढता पाय घेतल्यामुळे तेल उत्पादक कंपन्यांवर उरलेल्या तेलाचं करायचं काय? हा प्रश्न पडला आणि त्यांना प्रत्यक्ष तेल उचलून नेणाऱ्या खरेदीदाराची गरज भासू लागली. या स्पर्धेमध्ये तेलाच्या किंमती खाली येत येत शून्याच्याही खाली गेल्या. मंगळवारी काहीसं सकारात्मक होत या किंमती शून्याच्या काही अंशी वर म्हणजेच ०.३९ डॉलर प्रती बॅरल झाल्या.

कोरोनाच्या जागतिक संकटामुळे तेल उत्पादनावर आलेली ही संक्रांत अधिकच भीषण रुप धारण करू शकते. आशिया खंडातल्या विकसनशील देशांसोबतच अमेरिका, युरोपातील देश आदी ठिकाणी देखील कोरोना आणि लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणावर तेलाची मागणी घटली आहे. त्यात या देशांचे जीडीपी पुढचं वर्षभर २ ते ४ च्या मध्येच राहणार असल्यामुळे तेलाची मागणी जास्तच खाली येईल. त्याचा थेट परिणाम अमेरिकेवर होणार आहे. कारण अमेरिकेमध्ये सर्वाधिक तेल उत्पादक कंपन्या आहेत. त्या आर्थिक संकटात आल्या, तर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला हा मोठा फटका बसू शकतो.

First Published on: April 21, 2020 10:37 AM
Exit mobile version