राजकारणातील नेत्यांना धमकीचं सत्र सुरूच, राहुल गांधींनाही जीवे मारण्याची धमकी

राजकारणातील नेत्यांना धमकीचं सत्र सुरूच, राहुल गांधींनाही जीवे मारण्याची धमकी

संग्रहित छायाचित्र

मागील काही दिवसांपासून राजकारणातील नेत्यांमागे धमकीचं सत्र सुरू आहे. भाजप नेते नितीन गडकरी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला इंदूर पोलिसांनी अटक केली आहे. दयासिंग उर्फ ऐशीलाल झाम असं ६० वर्षीय आरोपीचं नाव आहे. गेल्या वर्षी भारत जोडो यात्रेदरम्यान ही धमकी देण्यात आली होती.

काँग्रेसला नवसंजीवनी मिळवून देण्यासाठी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली होती. या यात्रेला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. ही यात्रा मध्य प्रदेशमध्ये दाखल होण्यापूर्वी राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. एका पत्राद्वारे ही धमकी देण्यात आली होती. हे पत्र इंदूरमधील एका मिठाईच्या दुकानाबाहेर मिळाले होते. त्यानंतर अज्ञात आरोपीविरोधात भादवी कलम ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी २४ नोव्हेंबरला दयासिंगला अटक करण्यात आली होती. त्यानंतर ते २९ नोव्हेंबरला जामिनावर बाहेर आले होते.

पत्रात नेमकं काय होतं?

मिठाईच्या दुकानाबाहेर मिळालेल्या पत्रावर वाहे गुरू लिहिण्यात आले होते. त्याखाली १९८४मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलीचा उल्लेख करण्यात आला होता. या अत्याचाराविरोधात कोणत्याही पक्षाने आवाज उठवला नाही, असेही या पत्रात नमूद करण्यात आले होते.

नितीन गडकरींना धमकीचे फोन

साधारणपणे पंधरा दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावाने धमकीचे तीन फोन आले होते. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या नागपुरातल्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी फोन करणाऱ्याचा शोध घेण्यात आला होता. जयेश कंठा असे या आरोपीचे नाव असून बेळगाव येथील तुरुगांत तो हत्येप्रकरणी शिक्षा भोगत आहे. त्याने कारागृहातून केंद्रीय मंत्री गडकरी यांना धमकीचे फोन केले होते.

अरविंद केजरीवालांना धमकी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपी हा मुंडका येथील रहिवासी असून त्याची मानसिक स्थिती ठीक नाही, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

जयप्रकाश असे आरोपीचे नाव आहे. ३८ वर्षीय जयप्रकाशने मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास पोलीस कंट्रोल रूमला फोन करून मुख्यमंत्री केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. हा फोन येताच पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला. त्वरित आरोपीचा शोध घेऊन अल्पावधीतच त्याला ताब्यात घेतले. दिल्लीतील गुलाबी बागमध्ये आरोपीवर उपचार सुरू असल्याने पोलिसांनी त्याला अटक केली नाही. तथापि, त्याची चौकशी सुरू आहे.

दिल्ली विमानतळावर बॉम्बची अफवा पसरवणाऱ्या २० वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने फोनद्वारे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिली होती. मात्र, ही केवळ अफवा असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले. यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या.


हेही वाचा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपी मानसिक रुग्ण


 

First Published on: April 28, 2023 10:18 AM
Exit mobile version