दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपी मानसिक रुग्ण

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal) यांना एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आरोपी हा मुंडका येथील रहिवासी असून त्याची मानसिक स्थिती ठीक नाही, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

जयप्रकाश असे आरोपीचे नाव आहे. 38 वर्षीय जयप्रकाशने मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास पोलीस कंट्रोल रूमला फोन करून मुख्यमंत्री केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. हा फोन येताच पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला. त्वरित आरोपीचा शोध घेऊन अल्पावधीतच त्याला ताब्यात घेतले. दिल्लीतील गुलाबी बागमध्ये आरोपीवर उपचार सुरू असल्याने पोलिसांनी त्याला अटक केली नाही. तथापि, त्याची चौकशी सुरू आहे.

हेही वाचा – layoffs : मेटामध्ये पुन्हा नोकरकपातीची शक्यता; फेसबुक सीईओ मार्क झुकरबर्गकडून संकेत

याआधी नितीन गडकरींना धमकीचे फोन
गेल्या काही दिवसांपासून उद्योजक आणि राजकीय नेत्यांना धमकीचे फोन करण्याचे प्रकार वाढतच चालले आहे. साधारणपणे पंधरा दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या नावाने धमकीचे तीन फोन आले होते. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या नागपुरातल्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली. दुसऱ्या दिवशी फोन करणाऱ्याचा शोध घेण्यात आला. जयेश कंठा असे या आरोपीचे नाव असून बेळगाव येथील तुरुगांत तो हत्येप्रकरणी शिक्षा भोगत आहे. त्याने कारागृहातून केंद्रीय मंत्री गडकरी यांना धमकीचे फोन केले होते.

त्याशिवाय, मुंबईतील बीकेसी येथील धीरूबाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत बॉम्ब ठेवल्याची धमकी एका इसमाने दिली. त्याच्या धमकीनंतर या शाळेत आणि आसपासच्या परिसरात एकच खळबळ उडाली. बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरूवात केली. परंतु, काही तासाने स्वत: आरोपीनेच फोन करत प्रसिद्धीसाठी बॉम्ब ठेवल्याची धमकी दिल्याचे सांगितले.