Lockdown in Delhi: आज रात्री १० वाजेपासून एका आठवड्याचा लॉकडाऊन

Lockdown in Delhi: आज रात्री १० वाजेपासून एका आठवड्याचा लॉकडाऊन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता दिल्लीत एका आठवड्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन आज रात्री १० वाजेपासून पुढील सोमवार म्हणजेच २६ एप्रिलच्या पहाटे ५ वाजेपर्यंत लागू असणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. अरविंद केजरीवाल यांनी राज्यपाल अनिल बैजल यांच्यासोबत चर्चा करुन सहा दिवसांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी दिल्ली सरकारने शनिवार व रविवार कर्फ्यू लागू केला होता. सरकारचे सर्व प्रयत्न असूनही, दिल्लीत कोरोना बाधितांच्या आकड्यांचा आलेख हा दिवसेंदिवस वाढत होता, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर देखील त्याचा ताण पडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

दिल्लीमध्ये झपाट्याने होणाऱ्या रुग्णवाढीमुळे रुग्णांना दाखल करून घेणे शक्य नाही. त्यामुळे लॉकडाऊन करण्याशिवाय कोणताही पर्याय नाही, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. आज रात्री दहा ते पुढील सोमवार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. तर सहा दिवसांचा लॉकडाऊन आहे त्यामुळे कोणीही दिल्ली सोडून जाऊ नका. आम्ही तुमची काळजी घेऊ असं आश्वासन दिले. तसेच हा लॉकाडाऊन वाढवण्याची गरज भासू नये, अशी अपेक्षाही केजरीवाल यांनी व्यक्त केली.  यावेळी मेडिकल, खाण्यापिण्याची दुकाने सुरू राहतील. काय सुरू राहणार व काय बंद यासंबंधी सविस्तर माहिती लवकरच जाहीर करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत एकाच दिवसात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण २५ हजार ४६२ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. तर या कोरोना संसर्गाचे प्रमाण २९.७४ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. या आकडेवारीनुसार, दिल्लीतील प्रत्येक तिसरा नमुना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे.


First Published on: April 19, 2021 1:49 PM
Exit mobile version