Sunanda Pushkar death: मीडिया ट्रायल थांबवा; अर्णब गोस्वामीला हायकोर्टाने झापले

Sunanda Pushkar death: मीडिया ट्रायल थांबवा; अर्णब गोस्वामीला हायकोर्टाने झापले

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी

एखादी बातमी चालवत असताना स्वतःचा मालमसाला त्यात टाकून अनावश्यक आरडाओरडा आणि हातवारे करणाऱ्या रिपब्लिक टीव्हीच्या संपादक अर्णब गोस्वामीला आता दिल्ली हायकोर्टाने दणका दिला आहे. काँग्रेस नेते शशी थरुर यांची पत्नी सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात अर्णबने मीडिया ट्रायल सुरु करुन समांतर न्यायालय सुरु केले होते. या प्रकरणावर दिल्ली हायकोर्टात सुनावणी होत असताना अर्णबला बातम्या देताना संयम बाळगण्यास सांगितले गेले. तसेच एखाद्या गुन्ह्याच्या प्रकरणात पोलिसांचा किंवा इतर यंत्रणांचा तपास सुरु असताना तुम्ही स्वतःच निर्णय देऊ शकत नाही, अशा शब्दात त्याला सुनावण्यात आले आहे.

न्यायाधीश मुक्ता गुप्ता यांनी सांगितले की, “माध्यमांवर अंकुश आणला जावा, हे कोर्ट सांगत नाही. मात्र माध्यमांनी तपासाचे पावित्र्य भंग करु नये. माध्यमे कुणालाही दोषी ठरवू शकत नाहीत किंवा कुणी दोषी असल्याचे संकेतही देऊ शकत नाहीत. एखाद्या प्रकरणाचा तपास किंवा लांबलेल्या कोर्टातील खटल्याचे वार्तांकन करताना माध्यमांना जरा संयम बाळगावा लागेल.” हे निर्देश देत असताना न्यायाधीश गुप्ता यांनी २०१७ च्या एका खटल्याचा हवाला दिला. त्या आदेशात पत्रकार आणि वृत्तवाहिनीच्या वकीलांनी भविष्यात बातमी देताना आम्ही खबरदारी घेऊ, असे आश्वासन दिले होते.

जानेवारी २०१४ मध्ये दिल्ली येथे सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाला होता. या मृत्यूनंतर रिपब्लिक वाहिनीने शशी थरुर यांच्यावर बिनबुडाचे आरोप लावले होते. आपली प्रतिमा मलिन केल्याबद्दल शशी थरुर यांनी दिल्ली हायकोर्टात अर्णब आणि रिपब्लिक वाहिनीच्या विरोधात खटला दाखल करुन समांतर न्यायालय बंद करण्यात यावे, अशी मागणी याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर गुरुवारी न्यायाधीश मुक्ता गुप्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

First Published on: September 11, 2020 12:16 PM
Exit mobile version