‘गार्गी’ कॉलेज विनयभंगप्रकरणी केंद्र सरकार, सीबीआय, दिल्ली पोलिसांना नोटीस

‘गार्गी’ कॉलेज विनयभंगप्रकरणी केंद्र सरकार, सीबीआय, दिल्ली पोलिसांना नोटीस

काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या गार्गी महाविद्यालयात एकाच वेळी अनेक विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आता दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि दिल्ली पोलिसांना नोटीस पाठवली आहे. या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी एका याचिकेद्वारे दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे. यासंदर्भातली पुढील सुनावणी ३० एप्रिल रोजी होणार आहे.

अटक करण्यात आलेल्या १० जणांना जामीन

६ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या गार्गी या मुलींच्या महाविद्यालयामध्ये कलामहोत्सव आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान, अचानक दारूच्या नशेत काही तरूण महाविद्यालयात शिरले आणि त्यांनी विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची तक्रार दिल्ली पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे. त्यांना आधी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी झालेल्या सुनावणीमध्ये त्यांना १० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. महाविद्यालयातील काही विद्यार्थिनींनी या प्रकाराला सोशल मीडियावर वाचा फोडल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. यासंदर्भात १० फेब्रुवारी रोजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.

२३ सीसीटीव्हींच्या फुटेजची तपासणी

या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका १३ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाकडे दाद मागण्याचे निर्देश याचिकाकर्त्यांना दिले होते. त्यानुसार आज झालेल्या सुनावणीमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. दरम्यान, या घटनेच्या चौकशीसाठी एकूण २३ सीसीटीव्हींचं फुटेज तपासण्यात आलं असून पोलिसांची ११ पथकं तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.


वाचा सविस्तर – गार्गी कॉलेजमध्ये अनेक मुलींचा एकाच वेळी विनयभंग!
First Published on: February 17, 2020 8:51 PM
Exit mobile version