Delhi Horror : पाच आरोपींपैकी एक जण भाजपाचा नेता; केजरीवाल म्हणाले, राजकीय संबंध असले तरीही…

Delhi Horror : पाच आरोपींपैकी एक जण भाजपाचा नेता; केजरीवाल म्हणाले, राजकीय संबंध असले तरीही…

नवी दिल्ली – नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दिल्लीतील कांजवाला येथे बलेनो कारने एका तरुणीच्या स्कुटीला धडक देऊन तिला खाली पाडले. कारला अडकलेल्या या तरुणीला तब्बल 13 किलोमीटर फरफटत नेले. यात तरुणीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तथापि, हा अपघात नसून ‘निर्भया’ प्रकरणाची पुनरावृत्ती आहे, असा दावा तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. यावरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा – दिल्लीतील तरुणीचा ‘तो’ अपघात नव्हे, ‘निर्भया’ची पुनरावृत्ती; कुटुंबीयांचा दावा

महिलेसोबत जे घडले ते अतिशय लज्जास्पद असून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यांना फाशी झाली पाहिजे, असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत. केजरीवाल पुढे म्हणाले की, मी उपराज्यपालांशी संवाद साधून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. त्यांच्याविरोधात आयपीसीची कठोर कलमे लावली जावीत. यातून राजकीय संपर्क समोर आले तरीही आरोपींवर उदारता दाखवू नये, अशी विनंती अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी घटना घडल्याने देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. यापैकी एकजण भाजपाचा नेता आहे. मनोज मित्तल असं त्याचं नाव असून सुलतानपुरी भागात त्याचं रेशनचं दुकान आहे. या परिसरात त्याचे पोस्टर्सही लावण्यात आलेले आहेत. घटनेवेळी मित्तर कारमध्ये होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेतच. त्यामुळे याप्रकरणी राजकीय संबंध समोर आले तरीही आरोपींवर कोणतीही दया न दाखवता त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.


दिल्ली महिला आयोगाकडून दखल
या संपूर्ण घटनेची दिल्ली महिला आयोगाने दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनीही या संपूर्ण प्रकरणावर दु:ख व्यक्त केले आहे. मद्यधुंद अवस्थेतील काही मुलांच्या कारने एका तरुणीच्या स्कूटीला धडक दिली आणि तिला अनेक किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचे सांगण्यात येते. हे प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. मी दिल्ली पोलिसांना हजर राहण्याचे समन्स बजावत आहे. संपूर्ण सत्य बाहेर आले पाहिजे, असे ट्वीट त्यांनी केले आहे.

First Published on: January 2, 2023 9:13 PM
Exit mobile version