भारतात तीन पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक, पाकिस्तानी दूतावासातच होते नियुक्तीवर!

भारतात तीन पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक, पाकिस्तानी दूतावासातच होते नियुक्तीवर!

पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांमध्ये सीमारेषेपलीकडून मोठ्या प्रमाणावर कारवाया केल्या जात आहेत. अनेकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. पण प्रत्यक्ष राजधानी दिल्लीमध्येच पाकिस्तानचे गुप्तहेर असल्याचा धक्कादायक प्रकार आता उघड झाला आहे. खुद्द पाकिस्तानच्या दूतावासामध्येच हे गुप्तहेर नियुक्तीला असल्याचं स्पष्ट झालं असून दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या तिघांना अटक केली आहे. मात्र, ते दूतावासामध्ये नियुक्तीवर असल्यामुळे त्यांच्यावर भारतात कारवाई करता येणार नसून त्यांना पाकिस्तानच्या हवाली केलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये खळबळ उडाली आहे.

२४ तासांत भारत सोडण्याचे आदेश

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रविवारी मोठी कारवाई करत या तिघांना अटक केली आहे. यांच्यापैकी दोघेजण हे पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेचे अधिकारी आहेत. ते भारतात व्हिसा अधिकारी म्हणून आले होते. तर यातला तिसरा त्यांचा ड्रायव्हर म्हणून काम करत होता. या तिघांवर गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्ली पोलीस लक्ष ठेऊन होते. त्यांना अटक केल्यानंतर २४ तासांच्या आत भारत सोडून पाकिस्तानला जाण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. पाकिस्तानी दूतावासातले दोन उच्चाधिकारीच गुप्तहेर असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पाकिस्तानला यासंदर्भात पत्रव्यवहार करून कळवण्यात आलं आहे. या पत्रातून भारतानं आपला तीव्र आक्षेप देखील नोंदवला आहे.

रंगेहाथ केली अटक

आबिद हुसैन आणि ताहिर खान अशी दोघा गुप्तहेरांची नावं आहेत. यापैकी आबिद हुसैन २०१८पासून भारतात आहे, तर ताहिर खान २०१५पासून भारतात आहे. भारतीय लष्करातल्या एका जवानाकडून गोपनीय दस्तऐवज घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आलं आहे. याशिवाय गे दोघे सातत्याने लष्कर, रेल्वे आणि इतर सरकारी विभागांची गोपनीय माहिती एकत्र करत होते. दरम्यान, हे दोघे दूतावासामधले उच्चाधिकारी असल्यामुळे त्यांच्यावर भारतीय कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही. त्यामुळे त्यांना पाकिस्तानच्या हवाली केलं जाईल.

First Published on: June 1, 2020 12:43 PM
Exit mobile version