भारत आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नात; पाक लष्कराच्या उलट्या बोंबा

भारत आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नात; पाक लष्कराच्या उलट्या बोंबा

पुलवामा हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तान लष्काराने पत्रकार परिषद घेतली असून भारताने आमच्यावर खोटे आरोप लावले असल्याच्या उलट्या बोंबा ठोकल्या आहेत. मेजर जनरल आसिफ गफूर हे या पत्रकार परिषदेला संबोधित करत आहेत. पाकिस्तान जेव्हा जेव्हा विकासाच्या मार्गावर चालू लागले तेव्हा तेव्हा भारताने सीमेवर कुरापती काढल्या असल्याचा आरोप पाकिस्तान लष्काराने केला आहे. तसेच भारतच पाकिस्तानवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही आसिफ गफूर यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.

मेजर जनरल आसिफ गफूर म्हणाले की, १९६६ ला भारताने आमच्यावर हल्ला केला. या युद्धामुळे पाकिस्तानचे खूप मोठे नुकसान झाले. १९५० नंतर आम्ही कुठे थोडी प्रगती करू लागलो होतो, त्यात खंड पडला. या युद्धातून बाहेर आल्यानंतर १९७१ ते १९८४ पर्यंत सीमेवर काहीच हालचाल झाली नाही. आम्ही पुन्हा विकासाच्या मार्गावर जायला लागलो. पण त्यानंतर सियाचीन प्रकरण घडले.

पुलवामावर हल्ला करुन आमचा काय फायदा?

“फेब्रुवारी-मार्च महिन्यात पाकिस्तानमध्ये आठ महत्त्वाचे कार्यक्रम होत आहेत. सौदी अरेबियाचे राजे इथे येणार होते, युनायटेड नेशनची महत्त्वाची बैठक होत आहे, कुलभूषण जाधव यांची आंतरराष्ट्रीय कोर्टात सुनावणी होणार आहे, पाकिस्तान सुपर लीगचे सामने होणार आहेत तसेच FATA ची महत्त्वपूर्ण बैठक पाकिस्तानमध्ये होणार आहे. तसेच भारतात देखील काही दिवसांत निवडणुका येणार आहेत. आमच्या पंतप्रधाननांनी सांगितल्याप्रमाणे अशा परिस्थितीत आम्ही भारतावर हल्ला का करू? आमच्या देशात जर आठ महत्त्वाच्या बैठका होणार आहेत, तर असा हल्ला करुन आम्ही आमचे नुकसान का करुन घेऊ? या हल्ल्यातून आमचा काय फायदा होणार आहे?” असे प्रश्न आसिफ गफूरने उपस्थित केले आहेत.

पुलवामामध्ये भारताची अनेक स्तरावर सुरक्षा व्यवस्था उभारलेली आहे. ही सुरक्षा व्यवस्था भेदून कुणालाही शिरणे सोपे नाही. मग तरिही असा हल्ला का झाला? ज्या गाडीतून हल्ला झाला ती गाडी पाकिस्तानची नाहीच. तसेच ज्या मुलाने हल्ला केला तो स्वतः काश्मीरचा आहे. मग त्याने हा हल्ला का केला? याचे उत्तर भारतानेच द्यायला हवे. काश्मीरमध्ये हल्ला होणार, हे अनेक दिवसांपासून बोलले जात होते. सोशल मीडियावर त्याचे पुरावे आता टाकले गेले आहेत.

First Published on: February 22, 2019 3:53 PM
Exit mobile version