दिव्यांगांचा अनोखा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

दिव्यांगांचा अनोखा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

योग साधना करताना दिव्यांग व्यक्ती (सौजन्य - एएनआय)

जागतिक योग दिनानिमित्त देशभरातील ८०० दिव्यांग व्यक्तींनी एकत्र येऊन आगळा वेगळा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ बनवला आहे. विविध प्रकारची व्यंग असलेले स्पर्धक यांनी गुजरातमधील अहमदामध्ये योग दिनाच्या दिवशी एकत्र आले होते. त्यांची ‘Largest Silent Yoga Class’ म्हणजेच सर्वाधीक वेळ शांततेत योगा करण्यासाठी ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. यामध्ये सहभाग घेतलेल्या स्पर्धकांनी मे महिन्यापासून अहमदाबादच्या शिवानंद आश्रमात योग गुरूंच्या प्रशिक्षणाखाली सराव केला होता.

मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले 

दिव्यांगांच्या वेगळ्या प्रयत्नाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनीही ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’साठी गौरोद्गार काढले आहेत. “योग साधना करणं ही आपली प्राचीन संस्कृती आहे. काल देशात सर्वत्र चौथा जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. अहमदाबादमध्ये दिव्यांगांच्या योगाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली. याचा मला अभिमान आहे. या कार्यक्रमाला देशातील विविध भागातून आलेल्या दिव्यांगांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.”

या कार्यक्रमासाठी दहा राज्यामधून स्पर्धक नेमण्यात आले होते. यामध्ये ब्लाइंड पीपल्स असोसिएशन (बीपीए), अपंग मानव मंडळ आणि अंध कन्या प्रकाश गृह यांसह इतर संस्थांच्या दिव्यांगांचा समावेश होता.

सर्व स्पर्धकांना हेडफोन्स देण्यात आले होते. हे हेडफोन्स प्रात्यक्षिकांमध्ये ब्ल्यूटुथद्वारे जोडले गेले होते. त्यामुळे योग गुरूच्या सूचना ऐकून त्यानुसार प्रात्यक्षिकं करणे स्पर्धकांना सोपे जात होते.
– डॉ. विक्रांत पांडे, तहसीलदार, अहमदाबाद

देशभरात काल ४ था ‘जागतिक योग दिन’ साजरा करण्यात झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह ५० हजार लोकांनी विविध ठिकाणी योगा केला. २१ जून २०१५ रोजी पहिल्यांदा भारतात योग दिन साजरा करण्यात आला होता. त्यावेळी ३० हजार जणांनी यामध्ये सहभाग घेतला होता. पंतप्रधान मोदींनीही दिल्लीच्या राजपथ येथे योग साधना केली होती.

First Published on: June 22, 2018 1:29 PM
Exit mobile version