सौंदर्य ठरले शाप, मत्सरातून तरुणीची ३३ वेळा भोसकून निर्घृण हत्या

सौंदर्य ठरले शाप, मत्सरातून तरुणीची ३३ वेळा भोसकून निर्घृण हत्या

जन्मजात सौंदर्य लाभणं ही खरं तर प्रत्येक स्त्रीसाठी अभिमानाची गोष्ट असते. पण आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टनम येथे राहणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणीसाठी मात्र हेच सौंदर्य जीवघेणे ठरल्याची भयानक घटना गुरुवारी घडली. दिव्या असे या तरुणीचे नाव असून ती सुंदर असल्याने तिची घरमालकिण गुताला वसंता हिला तिच्याबद्दल मत्सर निर्माण झाला. यातूनच तिने दिव्याला शरीरभर चटके देत ३३ वेळा भोसकले, तिला अन्नपाण्यावाचून उपाशी ठेवले पण एवढ्यावर हे क्रौर्य थांबले नाही. तर या विकृत घरमालकिणीने व तिच्या कुटुंबीयांनी दिव्याचे लांबसडक केस कापले, तिच्या भुवया कापल्या व तिला विद्रुप करून तडफडवून ठार केले. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून पोलिसांनी रविवारी घरमालकिणीसह सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिव्या नोकरीच्या शोधार्थ विशाखापट्टणम येथे आली होती. तेथे ती वसंता हिच्या घरात एकटीच भाड्याने राहत होती. ती दिसायला सुंदर असल्याने सर्वजण नेहमीच तिची स्तुती करायचे. हे गुतालाला आवडत नव्हते. यातूनच गुताला हिच्या मनात दिव्याबद्दल मत्सर निर्माण झाला. याच रागातून तिने दिव्याला शरीरविक्रीच्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न केला. पण दिव्याने त्यास विरोध केल्याने गुताला अधिकच चवताळली होती. याच रागातून तिने दिव्याला घरात डांबून ठेवले. नंतर तिचे अन्नपाणी बंद करून दिव्याला उपाशी मारण्याची योजना गुताला हिने आखली. पाच दिवस दिव्याला अन्नपाणी न देता तिच्या शरीराच्या प्रत्येक भागावर गुताला व तिच्या कुटुंबातील सदस्यांनी चटके दिले. पाच दिवसांपासून पोटात अन्नाचा एक कणही न गेल्याने दिव्या बेशुद्ध पडली. त्यानंतर गुतालाने तिच्या शरीरावर ३३ वेळा धारदार शस्त्राने भोसकले. यात दिव्याचा मृत्यू झाला. त्यानंतर गुतालाने तिचे केस व भुवया कापल्या. नंतर शेजाऱ्यांना संशय येऊ नये म्हणून दिव्याचा मृत्यू अकस्मिक आजाराने झाल्याचा बनाव गुताला हिने केला. दिव्याच्या शरीरावरच्या व चेहऱ्यावरच्या जखमा दिसू नयेत म्हणून तिचा मृतदेह फुलांनी सजवला व अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. मात्र ज्या गाडीतून हा मृतदेह नेण्यात येत होता त्याच्या चालकाला संशय आला. त्याने पोलिसांना याबद्दल कळवले त्यानंतर ही घटना उघडकीस आली.

विशेष म्हणजे २०१५ साली दिव्याची आई, भाऊ व आजीचीही काही अज्ञातांनी हत्या केली होती. यामुळे दिव्या एकटीच होती. दरम्यान, दिव्याच्या कुटुंबीयांच्या हत्येचा तपास सुरू असतानाच दिव्याचीही हत्या झाल्याने आंध्र प्रदेश पोलिसांसमोर नवीन आव्हान उभे राहीले आहे.

First Published on: June 8, 2020 5:53 PM
Exit mobile version