डॉक्टरांच्या परवानगी शिवाय Covid-19 ची टेस्ट करता येणार; सरकारचा नवा नियम

डॉक्टरांच्या परवानगी शिवाय Covid-19 ची टेस्ट करता येणार; सरकारचा नवा नियम

कोरोना विषाणूची भीती आजकाल प्रत्येकाच्या मनात आहे. अनलॉक नंतर, प्रत्येकाला असे वाटू लागले की, एक न एक दिवस आपण देखील कोरोनाचे बळी पडू शकतो. अशा परिस्थितीत, केवळ चाचणी करून आपण स्वत:ला समाधानी करू शकतो. ज्या लोकांच्या मनात कोरोनाची शंका आहे, अशा लोकांना डॉक्टरांच्या निर्देशानुसार तसेच परवानगी शिवाय कोरोनाची तपासणी करणे शक्य नव्हते, म्हणूनच लोकांना कोरोना तपासणी करता येत नव्हती. मात्र आता याची चिंता करण्याची गरज नाही. कारण आता वैद्यकीय परवानगी अर्थात Doctor Prescription शिवाय कोरोना तपासणी करता येणार आहे.

नुकतीच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) सर्व राज्यांना पत्र लिहून कोरोना तपासणीसाठी मेडिकल स्लिपची सक्ती त्वरित रद्द करण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. अनावश्यक डॉक्टरांच्या परवानगीमुळे सरकारी रुग्णालयांमध्ये अधिक दबाव आहे असे राज्यांना सांगण्यात आले आहे. या नियमामुळे सामान्य लोकांना कोरोना चाचणी करून घेण्यास बराच विलंब होत आहे.

आयसीएमआरने असे ही म्हटले की, राज्यातील सर्व टेस्ट लॅबला कोणत्याही वैद्यकीय परवानगीशिवाय चाचणी घेण्यास परवानगी देण्यात यावी. त्याचबरोबर केवळ सरकारी डॉक्टरांचीच परवानगी नाही तर सर्व खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांनाही कोरोना टेस्टची परवानगी देण्याचा अधिकार देण्यात आला पाहिजे.

आतापर्यंत देशात ९० लाख ५६ हजार १७३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यापैकी २ लाख २९ हजार ५८८ जणांची काल बुधवारी चाचणी करण्यात आली असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ने दिली आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात मागील २४ तासांत देशात १९ हजार १४८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ४३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६ लाख ४ हजार ६४१ वर पोहोचली असून मृतांची संख्या १७ हजार ८३४ झाली आहे. तसेच २ लाख २६ हजार ९४७ अॅक्टिव्ह केसेस असून ३ लाख ५९ हजार ८६० जण कोरोनामुक्त झाले आहे.


दिलासादायक! अवघ्या दीड रूपयांच्या गोळीने बरे होणार कोरोना रूग्ण!

First Published on: July 2, 2020 10:56 AM
Exit mobile version