Coronavirus Crisis अमेरिकेतला लॉकडाऊन संपण्याच्या मार्गावर; ट्रम्प यांचा आशावाद

Coronavirus Crisis अमेरिकेतला लॉकडाऊन संपण्याच्या मार्गावर; ट्रम्प यांचा आशावाद

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

कोरोना व्हायरसचा संसर्ग चीनपासून सुरु झाला. मात्र आज जगातील जवळपास दीडशे देशांमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झालेला आहे. अमेरिकेत कोरोनाने सर्वाधिक हाहाकार माजवला आहे. अमेरिकेत आतापर्यंत ५ लाख ८० हजार जणांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. तर २३,३५२ लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोनामुळे लॉकडाऊनचा १९ दिवसांचा दुसरा टप्पा सुरु केला आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील लॉकडाऊन लवकरच संपुष्टात आणणार असल्याचे सांगितले आहे.

ट्रम्प म्हणाले की, आम्ही अमेरिका पुन्हा सुरु करण्याच्या अगदी जवळ आलो आहोत. माझे सहकारी आणि तज्ज्ञांसोबत माझी चर्चा सुरु आहे. लॉकडाऊनच्या समाप्तीआधीच आपण देशातील दैनंदिन व्यवहार सुरु करु, अशी आशा ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेतील ९५ टक्के जनता घरात अडकून पडली आहे.

व्हाईट हाऊस प्रशासनाच्यावतीने लवकरच नव्या मार्गदर्शनक सूचना सर्व राज्याच्या राज्यपालांना देण्यात येणार आहेत. त्यानंतर राज्यपाल त्या त्या राज्याचा सुरक्षेचा आढावा घेऊन हळु हळु लॉकडाऊन संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करतील. मी या निमित्ताने अमेरिकेतील नागरिकांना आश्वस्त करु इच्छितो की, तुमचे सामान्य जीवन पुर्वपदावर आणण्यासाठी माझे प्रशासन काम करत आहे.

ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेत सांगितले की, “आम्हाला वाटतं की अमेरिका पुन्हा पुर्वपदावर आली पाहीजे. आपला देश पुन्हा सुरळीत सुरु होईल आणि यात आम्ही यश नक्की मिळवू. थोड्याच दिवसात प्रशासनाच्यावतीने यावर निर्णय घेतला जाईल.” अमेरिका पुन्हा पुर्वपदावर आणण्यासाठी ट्रम्प यांच्यावतीने पुढील काही दिवसांत कडक नियम आखले जाणार आहेत, या नियमांचे पालन झाल्यास अमेरिकेतला लॉकाडाऊन संपिवण्यात येऊ शकतो.

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे अमेरिकेत अभुतपुर्व अशी परिस्थिती उद्भवली आहे. अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. न्यूयॉर्क सारखे अर्थव्यवस्थेचा कणा असलेले शहर बंद पडले आहे. पर्यटन व्यवसायाला खिळ बसली आहे. लाखो लोकांनी त्यांचे रोजगार गमावले आहेत. कोट्यवधी रुपयांचे पॅकेज जाहीर करुन देखील सकारात्मक परिणाम दिसलेले नाहीत.

First Published on: April 14, 2020 11:56 AM
Exit mobile version