द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपतीपदी होणार विराजमान, शपथविधीची जय्यत तयारी

द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपतीपदी होणार विराजमान, शपथविधीची जय्यत तयारी

देशाचे मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांचा कार्यकाळ काल, २४ जुलै रोजी संपला. त्यामुळे निवनियुक्त द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आज राष्ट्रपती पदाची शपथ घेणार आहेत. आज सकाळी साडेदहा वाजता संसद भवनात त्यांचा शपथविधी कार्यक्रम पार पडेल. भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमना मुर्मू यांना शपथ देणार आहेत. (Draupadi Murmu will take President oath today)

असा असेल कार्यक्रम

सकाळी ९ वाजून २५ मिनिटांनी द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात पोहोचतील. त्यानंतर त्यांना राष्ट्रपती गार्ड ऑफ ऑनर देण्यात येईल. सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी द्रौपदी मुर्मू आणि रामनाथ कोविंद राष्ट्रपती भवनातून संसद भवनाकडे एकत्र जातील. १० वाजून ०३ मिनिटांनी त्यांचा ताफा संसदेच्या गेट क्रमांक ५ येथील संसद भवनात पोहोचेल. त्यानंतर राष्ट्रपती, पंतप्रधान सेंट्रल हॉलकडे रवाना होतील. १० वाजून १० मिनिटांनी सर्वांचे सेंट्रल हॉलमध्ये आगमन होईल. त्यानंतर राष्ट्रगीत वाजवले जाईल. १० वाजून १५ मिनिटांनी शपथविधी सोहळा होईल.

हेही वाचा दोन मुले गमावली, पतीचीही साथ सुटली; द्रौपदी मुर्मूंचं आयुष्य होतं खूपच खडतर

शपथ घेतल्यानंतर १० वाजून २० मिनिटांनी नवीन राष्ट्रपती भाषण करतील. १० वाजून ४५ मिनिटांनी नवे राष्ट्रपती आणि मावळते राष्ट्रपती संसदेतून राष्ट्रपती भवनाकडे जातील. त्यानंतर, १० वाजून ५० मिनिटांनी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात समारंभ होईल आणि ११ वाजता राष्ट्रपती भवनात मावळत्या राष्ट्रपतींना निरोप दिला जाणार आहे.

राष्ट्रपतींच्या सोहळ्यात राज्यसभेचे अध्यक्ष, पंतप्रधान, भारताचे सरन्यायाधीश, लोकसभेचे अध्यक्ष, केंद्र सरकारचे मंत्री, राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य, केंद्र सरकारचे नागरी आणि लष्करी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

२४ जुलै रोजी रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार होता. त्यामुळे १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली. २१ जुलै रोजी मतमोजणी झाली. या मतमोजणीत द्रौपदी मुर्मू विजयी ठरल्या. युपीएने त्यांना उमेदवारी जाहीर करताच त्यांचा विजय निश्चित झाला होता. मात्र, निवडणुकीच्या मतमोजणीनंतर त्यांच्या विजयाची औपचारिक घोषणा करण्यात आली.

राष्ट्रपतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू या विजयी झाल्या. त्यांना ७१.२९ टक्के मते मिळाली आहेत. एकूण १०,५८,९८० मूल्यांच्या ४७०१ वैध मतांपैकी त्यांना ६,७६,८०३ मूल्याची २८२४ मते मिळाली. महाराष्ट्रातून त्यांना ३१,६७५ मूल्यांची मते मिळाली.

First Published on: July 25, 2022 8:28 AM
Exit mobile version