करोना विषामुळे भारतात औषधांच्या किमती वाढल्या

करोना विषामुळे भारतात औषधांच्या किमती वाढल्या

प्रातिनिधिक फोटो

चीनमध्ये करोना विषाणू कहर केला आहे. करोना विषाणूच्या संसर्गामुळे 1770 लोक मृत्युमुखी पडले असून 70,548 पेक्षा जास्त लोकांना त्याची लागण झाली आहे. चीनपुरता हा व्हायरस मर्यादित नसून जगातील सुमारे 30 देशांतील लोकांना त्याची लागण झाली आहे. संसर्ग होऊ नये, यासाठी चीनने तर दोन राज्यांतील लोकांना अन्य राज्यांमध्ये जाण्यासच बंदी घातली आहे. काही शहरांमधील लोकांना घराबाहेर पडायलाही बंदी आहे. करोना विषाणूचा फटका हा जगभरातील अनेक कंपन्यांना बसला आहे. करोना विषाणूमुळे भारतातील औषधांच्या किमती वाढल्या आहेत.

करोना विषाणूमुळे भारतात पॅरासिटामॉलसह अनेक औषधांच्या किमतीत 40 ते 70 टक्क्यांची वाढ झाली आहे. औषधांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून वेदनाशामक औषधांच्या किमतीत वाढ झाली आहे. झायड्स कॅडीला या फार्मा कंपनीचे अध्यक्ष पंकज पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वात जास्त वापरल्या जाणार्‍या पॅरासिटामॉलची किंमत जवळपास 40 टक्के वाढली आहे. तर अझिथ्रोमायसिन या अँटिबायोटिक्सची किंमत 70 टक्क्यांनी वाढली आहे. येत्या काही दिवसात कच्चा मालाचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर अडचण होऊ शकते. चीनमध्ये कोरोनामुळे अनेक कंपन्या बंद ठेवण्यात आल्या आहेत.

भारतात औषधांच्या निर्मितीसाठी चीनमधून मोठ्या प्रमाणात कच्चा माल आयात केला जातो. मात्र करोना विषाणूमुळे तेथील उत्पादन पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी इतर देशांना होणारा पुरवठा खंडीत झाला आहे. औषध निर्मिर्तीतील काही घटकांचा पुरवठा कमी झाल्याने किंमतीमध्ये वाढ झाली आहे. चीनमध्ये करोना विषाणूने (कोविड-19) थैमान घातले आहे. चीनशिवाय अन्य देशांत तीस ठिकाणी करोना विषाणूची साथ पसरली आहे. करोना विषाणूची लागण होऊ नये यासाठी चीन सरकार अत्यंत प्रयत्नशील आहे.

First Published on: February 19, 2020 2:07 AM
Exit mobile version