कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे केंद्राकडून सूचना जारी; ‘या’ खबरदारी घेण्याचे आवाहन

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे केंद्राकडून सूचना जारी; ‘या’ खबरदारी घेण्याचे आवाहन

नवी दिल्ली : देशातील कोरोना आणि फ्लूच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अत्यंत गंभीर झाले असून याबाबत एक सूचना करण्यात आली आहे. या सूचनेनुसार लोकांना गर्दीच्या आणि बंद ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच केंद्र सरकार येत्या 10 आणि 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय स्तरावर कोरोनाचा सामना करण्याच्या दृष्टीने एका मॉक ड्रिलचे आयोजन करणार आहे. यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने प्रत्येक राज्यातील आरोग्य मंत्रालयाशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे २७ मार्चला बैठक बोलावली आहे.

केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने कोरोना आणि फ्लूच्या वाढत्या प्रकरणांबाबत सूचना जाहिर करताना सर्वसामान्यांना काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. गर्दीच्या आणि बंद ठिकाणी मास्क वापरणे, शिंकताना आणि खोकताना नाक व तोंड झाकण्यासाठी रुमाल किंवा टिश्यू वापरणे आणि हाताची स्वच्छता राखणे, असे केंद्राने म्हटले आहे. याशिवाय लोकांना वारंवार हात धुण्याचा सल्लाही केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा – कर्नाटकामध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, रोड शो दरम्यान अज्ञात व्यक्ती आली गाडीजवळ

या सूचनांमध्ये सर्वसामान्यांना सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यापासून परावृत्त केले आहे. याशिवाय लोकांना चाचणीचा प्रचार करण्यास आणि त्रास होत असल्यास लक्षणे समजून घेऊन लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचवेळी पौढ व श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींनी वैयक्तिक संपर्क मर्यादित ठेवण्याचा सल्ला केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आला आहे.

10 आणि 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय स्तरावर मॉक ड्रील
कोरोना आणि फ्लूच्या वाढत्या प्रकरणाबाबत केंद्र सरकार येत्या 10 आणि 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय स्तरावर मॉक ड्रिल आयोजित करणार आहे. या मॉक ड्रिलमध्ये आयसीयू बेड, वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजन आणि मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल. आरोग्य मंत्रालयाने 27 मार्च रोजी दुपारी 4:30 वाजता राज्यांतील आरोग्य मंत्रालयासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक बोलावली आहे. या बैठकीत मॉक ड्रिलशी संबंधित सर्व माहिती शेअर केली जाणार आहे.

First Published on: March 25, 2023 11:00 PM
Exit mobile version