इंडोनेशिया भूकंपामुळे हादरले, १६२ जणांचा मृत्यू; इमारती कोसळल्या, रुग्णालयात गर्दी

इंडोनेशिया भूकंपामुळे हादरले, १६२ जणांचा मृत्यू; इमारती कोसळल्या, रुग्णालयात गर्दी

जकार्ता – इंडोनेशियाची राजधानी जकार्ता (Earthquake in Indonesia) येथे सोमवारी तीव्र भूकंप झाला आहे. यामुळे इमारतींना तडे गेले असून जवळपास १६२ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, शेकडो लोक जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता ५.६ रिश्टर स्केलवर मोजण्यात आली आहे. इमारती कोसळल्याने मलब्याखाली अनेकजण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आज, मंगळवारीही बचावकार्य सुरू आहे.

इंडोनेशियातील सियांजुर शहाराजवळ या भूकंपाचे केंद्र होते. येथे मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे. सोमवारी भूकंपाच्या हादऱ्याने लोकांनी घाबरून घराबाहेर पळ घेतला. या भूकंपामुळे इमारती कोसळल्या. यामुळे जखमींचा आकडाही वाढला आहे. सियांजुरच्या रुग्णालयात रात्री जखमींची मोठी रांग लागली होती. जखमींचा आकडा मोठा असल्याने रुग्णालयाच्या पार्किंगमध्येच टेंट बांधून उपचार करण्यात आले, तर काही जखमींवर फुटपाथवरच उपचार केले. तर, भूकंपामुळे वीज खंडीत झाल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी बॅटरीच्या (Torch Light) उजेडात रुग्णांवर उपचार केले.

राष्ट्रीय पोलीस प्रवक्ते डेडी प्रसेत्यो यांनी सांगितलं की, मंगळवारी सकाळी बचावकार्यासाठी शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले आहे. मलब्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम आज करण्यात येणार आहे. पश्चिम जावाचे गवर्नर रिदवान कामिल यांनी सांगितलं की, सोमवारी भूंकप झाल्याने १६२ लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये अनेक मुलं होती. तर, ३०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहे. त्यामुळे जखमी आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत ६२ मृतांची ओळख पटली असून १०० मृतांची ओळख पटलेली नाही. भूकंपामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत तर, वीज खंडीत झाली आहे. त्यामुळे बचावकार्यास अडथळे निर्माण होत आहेत. या भूकंपाचे धक्के जकार्तापासून ७५ किमीपर्यंत जाणवले. यामुळे २२०० घरांचं नुकसान झालं असून ५ हजारपेक्षा जास्त लोकांना सुरक्षास्थळी हलवण्यात आलं आहे. इंडोनेशियात सतत भूकंप घडत असतात. २००४ मध्ये उत्तरी इंडोनेशियामध्ये सुमात्रा द्विपवर ९.१ रिश्टल स्केलवर भूकंप झाला होता. यामुळे आजूबाजूचे १४ देश प्रभावित झाले होते.

First Published on: November 22, 2022 7:50 AM
Exit mobile version