बंडखोर आमदारांच्या जेवणावर लाखो रुपयाची उधळपट्टी, तर पूरग्रस्तांना २ कप तांदूळ, १ कप डाळ

बंडखोर आमदारांच्या जेवणावर लाखो रुपयाची उधळपट्टी, तर पूरग्रस्तांना २ कप तांदूळ, १ कप डाळ

आसामची राजधानी असलेल्या गुवाहटी शहर सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. ईशान्येकडील हे राज्य महाराष्ट्राच्या राजकारणाचा अखाडा झाले आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहटीमधील रेडिसन ब्लू Radisson Blu या पंचतारांकीत हॉटेलमध्ये मुक्कामी असून तेथे ते महागड्या मेजवाण्या झोडत महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील रणनिती आखत आहेत. हा सर्व खर्च आसाम सरकार करत आहे.  हे सगळं एकीकडे सुरू असताना दुसरीकडे आसाममधील अनेक गावात पूराने थैमान घातले आहे. घर पाण्याखाली गेल्याने हजारो कुटुंब बेघर झाली असून एक वेळच्या अन्नासाठीही त्यांना वणवण करावी लागत आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या राजकीय मंडळींवर लाखोची उधळपट्टी करण्यापेक्षा पूरग्रस्तांना मदत केल्यास त्यांना पुन्हा एकदा नव्याने आयुष्य जगता येईल अशा प्रतिक्रिया नेटीझन्स देत आहेत.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे इतर आमदारांसह गुवाहटीतील सर्वात पॉश पंचतारांकीत हॉटेल रैडिसन ब्लू मध्ये थांबले आहेत. सात दिवसांसाठी ते येथे मुक्कामी असून सात दिवसांचा हॉटेलचा खर्च जवळपास ५६ लाख रुपये एवढा आहे. आमदार आणि त्यांच्या कार्यकरत्यांसाठी हॉटेलचे ७० रुम्स बुक करण्यात आले आहेत. सामान्यांना सध्या हॉटेलमध्ये प्रवेशास मनाई आहे. आसाममध्ये सध्या अनेक गाव पूराच्या पाण्याखाली गेली असून हजारो कुटुंब बेघर झाली आहेत. मिळेत त्या ठिकाणी आश्रय घेत ते दिवस सरकारच्या मदतीची अपेक्षा ठेवून आहेत. पण सध्या आसाम सरकारवरही अप्रत्यक्षपणे महाराष्ट्रातल्या या बंडखोर आमदारांच्या देखरेखीची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे येथील भाजपचे नेते या बंडखोऱ्यांची बडदास्त ठेवण्यातच जास्त दंग झाले आहेत. तर दुसरीकडे पूरग्रस्तांना मदत म्हणून सरकारकडून प्रत्येकी दोन कप तांदूळ आणि एक कप डाळ या पीडितांना देण्यात येत आहे. जी अतिशय तुटपुंजी आहे. यामुळे अनेक नेत्यांनी या गरजू नागरिकांना दोन वेळंच जेवण देण्याऐवजी आमदारांवर होणारी उधळपट्टी आसाम सरकारने ताबडतोब थांबवावी असे आवाहनच केले आहे. तसेच काहींनी पूरग्रस्त कुटुंबाचे फोटोही टि्वट केले आहेत.

First Published on: June 24, 2022 4:31 PM
Exit mobile version