ट्रम्प आणि न्यूयॉर्क पोस्ट ब्लॉक करणाऱ्या विजया गड्डेंवर एलॉन मस्कचा हल्लाबोल, कोण आहे ही महिला?

ट्रम्प आणि न्यूयॉर्क पोस्ट ब्लॉक करणाऱ्या विजया गड्डेंवर एलॉन मस्कचा हल्लाबोल, कोण आहे ही महिला?

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, टेस्ला कंपनीचे आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतलाय. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर ४४ अब्जामध्ये विकत घेतल्यानंतर प्रत्येक युझर्सला स्वतंत्र्यपणे बोलता यावं किंवा मत व्यक्त करता यावं, असं त्यांचं मत आहे. परंतु कंपनी विकत घेतल्यानंतर काही जणांकडून मस्क यांच्यावर टीका केली जात आहे. यामध्ये आता विजया गड्डे या महिलेवर मस्क यांनी नाव न घेता टीका केली आहे.

ट्विटरच्या सेफ्टी, लीगल इश्यु आणि सेन्सिटिव्ह बाबी विजया गड्डे हाताळतात. परंतु मस्क यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. मोस्ट पॉवरफुल सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मस्कने न्यूयॉर्क पोस्टचे खाते निलंबित केल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या मुलावरील वादग्रस्त लेखाबाबत एलॉन मस्क यांनी न्यूयॉर्क पोस्टचे ट्विटर खाते निलंबित करण्याबाबत अयोग्य असल्याचे म्हटले आहे.

कंपनीच्या सेन्सॉरशीपशी संबंधित सर्व निर्णय विजया गड्डे घेतात. अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट बॅन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या सर्वप्रथम चर्चेत आल्या होत्या. ट्विटरचे नवीन बॉस मस्क यांनी विजया यांच्या सेन्सॉरशिप पॉलिसीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क या दोघांचे चाहते विजया गड्डे यांना टार्गेट करत आहेत. मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर विजया बोर्ड मीटिंगमध्ये भावूक झाल्या. ट्विटर एलॉन मस्क यांच्या ताब्यात गेल्यानंतर परिस्थिती बदलल्याचं निदर्शनास येत आहे.

कोण आहेत विजया गड्डे?

भारतीय वंशाच्या असलेल्या ४८ वर्षीय विजया गड्डे या ट्विटरच्या सेफ्टी, लीगल इश्यु आणि सेन्सिटिव्ह बाबी हाताळतात. ट्विटरच्या कायदेशीर, धोरण आणि सुरक्षा समस्यांच्या प्रमुख विजया गड्डे या व्यवसायाने वकील आहेत. २०११ मध्ये त्या कंपनीत रुजू झाल्या. २०१४ मध्ये फॉर्च्युनने ट्विटरच्या कार्यकारी टीमवर त्यांना सर्वात शक्तिशाली महिला म्हणून नाव दिले. विजया यापूर्वी ट्विटरच्या कायदेशीर संचालक होत्या.

माफी मागावी लागली

२०१८ मध्ये विजया भारतात आल्या होत्या. त्यावेळी विजया आणि ट्विटरचे माजी सीईओ जॅक डॉर्सी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. येथे त्यांनी काही महिला पत्रकार, कार्यकर्त्यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान जॅकच्या हातात ‘Smash Brahminical patriarchy’ असे लिहिलेले फलक होते. या फलकावरुन बराच गदारोळ झाला होता. डॉर्सीला एका दलित कार्यकर्त्याने या फलकासह पकडले होते. मात्र, यानंतर विजया गड्डे यांनीही माफी मागितली, असं ट्विटर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे.

गेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या हिंसाचारानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्याचा निर्णय विजया यांनी घेतला होता. यावरून त्यांच्या पॉवरचा अंदाज येऊ शकतो. याशिवाय, ट्विटरचे माजी सीईओ जॅक डॉर्सी यांच्यावरही विजया यांचा प्रभाव होता. एलॉन मस्क आणि विजया गाडे यांच्यामध्ये मतभेद असल्याचं यापूर्वीच निदर्शनास आलंय. त्यामुळे आता विजया गड्डे ट्विटरमध्ये राहणार की नाही, याबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे.


हेही वाचा : Elon Musk Twitter News : एलन मस्क ट्विटरचे नवे मालक; युजर्समध्ये निराशा, अनेकांनी डिलीट केले अकाऊंट


 

First Published on: April 28, 2022 10:36 PM
Exit mobile version