काय आहे भाजप-फेसबुक प्रकरण ज्यावरुन देशातील राजकारण तापलं, जाणून घ्या

काय आहे भाजप-फेसबुक प्रकरण ज्यावरुन देशातील राजकारण तापलं, जाणून घ्या

अमेरिकेतील एका आघाडीचे वर्तमानपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने प्रसिद्ध केलेल्या वृत्तामुळे भारतातील राजकारण चांगलेच तापले आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालाचा हवाला देत कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) फेसबुक आणि Whats app वर नियंत्रण ठेवत असल्याचा आरोप केला. भाजप आणि संघाने या माध्यमातून द्वेष आणि खोट्या बातम्या पसरविल्या, असं राहुल गांधी म्हणाले. तर, भाजप नेते आणि माहिती व प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. हा वाद इतका वाढला की फेसबुकला स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.

कॉंग्रेस-भाजपमध्ये युद्ध

अमेरिकेच्या वृत्तपत्राच्या अहवालानंतर भारतातील राजकारण तापले आहे. सोशल मीडियावर हा वाद रंगला आहे. राहुल गांधींची खिल्ली उडवताना रविशंकर प्रसाद यांनी ट्वीट केले की, “जे लोक स्वतःच्या पक्षातील लोकांवर प्रभाव टाकू शकत नाहीत ते भाजप-आरएसएस हे संपूर्ण जगावर नियंत्रण ठेवत असल्याचा आरोप करत आहेत.” राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत रविशंकर प्रसाद म्हणाले की, ते असे म्हणतात की संपूर्ण जगावर भाजप, आरएसएसचे नियंत्रण आहे. निवडणुकीपूर्वी माहितीचा वापर शस्त्रासारखा करण्यासाठी केंब्रिज Analytica आणि फेसबुकसोबत तुमचं संगनमत रंगेहाथ पकडलं गेलं होतं. आता आम्हाला प्रश्न विचारण्याची तुमची हिंमत कशी झाली?” असा प्रतिसवाल रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. रविशंकर प्रसाद म्हणाले, “खरं म्हणजे आज अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहे. आता आपल्या कुटुंबाद्वारे नियंत्रित केले जात नाही आणि म्हणूनच आपण दु: खी आहात. बरं तुम्ही बेंगळुरू हिंसाचाराचा निषेध केला नाही. तुमचे धाडस कुठे गेले?”

रविशंकर प्रसाद यांना काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. कॉंग्रेस नेते रणदीपसिंग सुरजेवाला म्हणाले, “असे दिसते आहे की खोटे ट्विट आणि खोटा अजेंडा हा एकमेव मार्ग बनला आहे. केंब्रिज Analytica च्या सेवेचा वापर कॉंग्रेसने कधीही केला नाही. भाजप केंब्रिज Analyticaचा ग्राहक असल्याचा दावा सुरजेवाला यांनी केला. रवीशंकर प्रसाद हे का नाही सांगत?

भारतात केवळ कॉंग्रेस-भाजपमध्ये राजकीय युद्ध सुरू आहे, असे नाही तर इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही फेसबुकच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “मार्क झुकरबर्ग कृपया यावर चर्चा करा. पंतप्रधान मोदींचे समर्थक अनखी दास यांची फेसबुकवर नियुक्ती केली गेली, ज्यांनी सोशल मीडियावर मुस्लिम विरोधी पोस्टना आनंदाने मंजुरी दिली. आपण सिद्ध केले आहे की आपण जे उपदेश करता त्याचे अनुसरण करत नाहीत.

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी फेसबुकवर प्रश्न उपस्थित केले. “वेगवेगळ्या लोकशाहींमध्ये फेसबुकची मानके वेगळी का आहेत? हे कोणत्या प्रकारे चांगले व्यासपीठ आहे? हा अहवाल भाजपासाठी हानिकारक आहे. फेसबुकसोबतचे भाजपचे संबंध समोर आले असून फेसबुक कर्मचार्‍यांवर भाजपच्या नियंत्रणाचेही स्वरूप समोर आले आहे.

फेसबुकचे स्पष्टीकरण

भारतात निर्माण होणाऱ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने रविवारी म्हटले की, “आम्ही द्वेषयुक्त भाषण आणि हिंसा भडकवणार्‍या गोष्टींवर बंदी आणतो. आम्ही हे धोरण जागतिक स्तरावर राबवितो. कोणत्याही राजकीय पक्ष किंवा संस्थांना किंवा त्यांच्याशी संबंधित व्यक्तींना यापासून सूट दिली जात नाही. आम्हाला माहित आहे की या क्षेत्रात अधिक काम करणे आवश्यक आहे (द्वेषयुक्त भाषण आणि प्रक्षोभक कंटेटवर प्रतिबंध करणे). आम्ही पुढे जात आहोत. चांगुलपणा आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही नियमितपणे आमच्या प्रक्रियेचे ऑडिट करतो.

अहवालात काय आहे, ज्यामुळे वाद निर्माण झाला

‘फेसबुक हेट-स्पीच रुल्स कोलाईट विथ इंडियन पॉलिटिक्स’ या शीर्षकातील अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालामुळे हा संपूर्ण वाद निर्माण झाला आहे. भारतातील सत्ताधारी भाजप नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणांसंदर्भात फेसबुक नियम व कायदे शिथिल करतो, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. फेसबुक कर्मचाऱ्यांनी सांगितले की भारतात असे बरेच लोक आहेत जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर द्वेष पसरवतात. कर्मचारी म्हणतात की आभासी जगात द्वेष पोस्ट केल्याने वास्तविक जगात हिंसा आणि तणाव वाढतो.


हेही वाचा – फेसबुक, व्हाट्सअ‍ॅपवर भाजप-संघाचा ताबा; खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवतात – राहुल गांधी


त्यात तेलंगणाचे भाजप खासदार टी राजासिंह यांच्या एका पोस्टचा उल्लेख करण्यात आला आहे. यात त्यांनी अल्पसंख्याक समाजाविरुद्ध हिंसेला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या अहवालात फेसबुकमधील विद्यमान आणि माजी कर्मचाऱ्यांशी बातचीत केल्याचं सांगण्यात आले आहे. फेसबुकच्या कर्मचाऱ्यांनी राजा यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. पण भारतातील फेसबुकच्या वरीष्ठ अधिकारी अनखी दास यांनी सत्ताधारी भाजपच्या नेत्यांवर हेट स्पीच नियम लागू करण्याचा विरोध केला. वॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीनुसार, भाजप नेत्यांच्या पोस्टवर कारवाई केल्यास कंपनीच्या देशातील व्यवसायाचे नुकसान होईल, भारत हीच फेसबुकसाठी मोठी बाजारपेठ आहे, असे फेसबुक इंडियाच्या पब्लिक पॉलिसी डायरेक्टर अनखी दास यांनी कर्मचाऱ्याला सांगितले.


हेही वाचा – मॉल उघडले मंदिरं का नाही; राज ठाकरेंचा सवाल


 

First Published on: August 17, 2020 1:51 PM
Exit mobile version