शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये राहुल गांधींची फटकेबाजी!

शेतकऱ्यांच्या मोर्चामध्ये राहुल गांधींची फटकेबाजी!

दिल्ली किसान मार्च (फोटो सौजन्य - डीएनए)

महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून गदारोळ शांत होतो न होतो तोवर राजधानी दिल्लीमध्ये देशभरातल्या त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलं आहे. गुरुवारपासूनच शेतकऱ्यांची दिल्लीमध्ये जमायला सुरुवात झाली होती. आणि ठरल्याप्रमाणे शुक्रवारी सकाळपासून शेतकऱ्यांनी रामलीला मैदानावर ठिय्या मांडायला सुरुवात केली. मात्र, शेतकऱ्यांप्रमाणेच देशभरातले शेतकरी नेते आणि विरोधी पक्षांतले नेते आंदोलकांना भेटण्यासाठी येऊ लागले. त्याच वेळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलकांची भेट घेतली आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर सडकून टीका केली.

…मग शेतकऱ्यांची कर्ज माफ का होऊ शकत नाहीत?

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्याला हात घातला. ‘जर पंतप्रधानांच्या १५ निकटवर्तीयांचं कोट्यवधींचं कर्ज माफ होऊ शकतं, तर देशातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांची कर्ज का माफ होऊ शकत नाहीत?’ असा सवाल राहुल गांधींनी यावेळी उपस्थित केला. यासोबतच ‘पंतप्रधानांनी अदानी आणि अंबानी यांच्यामध्ये देश वाटून टाकला आहे. शेतकरी तुमच्याकडे फुकटची भीक मागत नसून ते त्यांचा हक्क मागत आहेत. मोदी दिलेली आश्वासनं विसरली असून ते फक्त पोकळ भाषणं देत आहेत’, असं देखील राहुल गांधी यावेळी म्हणाले.

…तर शेतकरी ‘कयामत’ आणतील – केजरीवाल

दरम्यान, राहुल गांधी यांच्याप्रमाणेच दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे मुख्य निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी देखील आंदोलकांची भेट घेऊन भाजप सरकारवर टीकास्त्र सोडलं. यावेळी त्यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. ‘आता या सरकारचे फक्त ५ महिने शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे मी सरकारकडे मागणी करतो की त्यांनी स्वामिनाथन अहवाल लागू करावा, नाहीतर २०१९मध्ये हे शेतकरी कयामत आणतील’, असा नारा अरविंद केजरीवाल यांनी यावेळी बोलताना दिला.


हेही वाचा – मृत शेतकऱ्यांच्या ‘कवट्या’ घेऊन दिल्लीत मोर्चा

या आंदोलनामध्ये देशभरातून शेतकऱ्यांप्रमाणेच शेतकरी नेते देखील सहभागी झाले होते. शरद पवार, मेधा पाटकर, योगेंद्र यादव अशा नेतेमंडळींसोबतच स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, राष्ट्रीय किसान मजदूर संघटना, किसान एकता संघटना, भारतीय किसान युनियन अशा एकूण २०८ शेतकरी संघटना मोर्चामध्ये सहभागी झाल्या आहेत.

First Published on: November 30, 2018 9:44 PM
Exit mobile version