घरदेश-विदेशमृत शेतकऱ्यांच्या 'कवट्या' घेऊन दिल्लीत मोर्चा

मृत शेतकऱ्यांच्या ‘कवट्या’ घेऊन दिल्लीत मोर्चा

Subscribe

संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला दीडपट हमीभाव या प्रमुख मागण्यासांठी शेतकरी बांधवांनी हा मोर्चा काढला आहे.

दिल्लीमध्ये कर्जमाफीची मागणी करत काही शेतकऱ्यांनी ‘कवटी’ मोर्चा काढला आहे. हे शेतकरी तामिळनाडूचे असून, त्यांनी काढलेल्या या अजब कवटी मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सर्व कवट्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या आहेत, असा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. हा कवटी मोर्चा घेऊन हजारो शेतकरी दिल्लीत दाखल झाले असून, आज (शुक्रवारी) हा मोर्चा संसदेवर धडकणार आहे. दरम्यान, ‘आज जर आम्हाला संसदेत जाण्यापासून रोखले तर आम्ही नग्न मोर्चा काढू’, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. दिल्लीच्या रामलीला मैदानावर गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या सर्व राज्यांधले शेतकरी पोहचले आहेत. संपूर्ण कर्जमाफी आणि शेतमालाला दीडपट हमीभाव या प्रमुख मागण्यासांठी शेतकरी बांधवांनी हा मोर्चा काढला आहे. याशिवाय ऑल इंडिया किसान संघर्ष समितचे शेतकरीही या कवटी मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. आम्ही पिकं घेतो तरीही पुरामुळे, दुष्काळामुळे आमचे नुकसान होते. त्यामुळे सरकारने आम्हाला भरपाई दिली पाहिजे आणि आमच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढला पाहिजे, अशी मागणी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी केली आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या २ तारखेला दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढला होता. त्यावेळी त्यांना दिल्लीत येण्यापासून रोखण्यासाठी पाण्याचा आणि अश्रूधुरांचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांना रोखून धरण्यासाठी लाठीचार्जही करण्यात आला होता. त्याचीच पुनरावृत्ती करत जर आज आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही विवस्त्र होऊन हा मोर्चा पुढे नेऊ असा इशारा, कवटी मोर्च्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे आज जेव्हा हे शेतकरी संसदेवर मोर्चा घेऊन जातील, त्यावेळी पोलीस बळाचा वापर करुन त्यांना अडवणार का? की शांततेच्या मार्गाने हा मोर्चा काढला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

दुसऱ्यांदा कवटी मोर्चा…

याआधी २०१७ मध्येही तामिळनाडूतील शेतकऱ्यांनी अशाचप्रकारे कवटी मोर्चा काढला होता. एप्रिल आणि जुलै महिन्यात काढण्यात आलेल्या त्या मोर्चामध्येही ‘आमच्या हातातील कवट्या या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कवट्या आहेत’, असा दावा त्यांनी केला होता. ज्या शेतकऱ्यांचा या कवट्या आहेत त्या सर्वांनी नापिकी, दुष्काळ आणि पूरासारख्या समस्यांना कंटाळून आत्महत्या केल्याचं आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी सांगितलं होतं. दरम्यान यावर्षी पुन्हा एकदा हा कवटी मोर्चा काढण्यात आला असून, आज तो दिल्लीत संसदेवर धडकणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -