उद्योग जगताला दिलासा देणारी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

उद्योग जगताला दिलासा देणारी अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

गेल्या काही दिवसांपासून भारतावर आर्थिक मंदीचे सावट आहे. उद्योगधंद्यासह शेअर मार्केटचा आर्थिक स्तर दिवसेंदिवस खाली येत आहे. भारताचा विकासदर घसरला आहे. त्यामुळे विरोधकांकडून आर्थिक मंदीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीकेची झोड केली जात आहे. घसरत्या अर्थव्यवस्थेला बळकटी यावी, यासाठी देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण प्रयत्न करत आहेत. गेल्या आठवड्यात निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या होत्या. यामध्ये ४५ लाख रुपयांपर्यंत घर खरेदी केली तर टॅक्स आकारला जाणार नाही, हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर शुक्रवारी निर्मला सीतारमण यांनी गोव्यात पत्रकार परिषद घेऊन उद्योग जगताला दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकार कॉर्पोरेट टॅक्समध्ये कपात करणार आहे. यासंदर्भातील अध्यादेश पारित झाला असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या आहेत.

अर्थमंत्र्यांच्या घोषणेनंतर शेअर बाजारात उसळी

दरम्यान, या घोषणेनंतर लगेच शेअर मार्केटमध्ये तेजी आली. शेअर मार्केटने १५०० अंकांनी उसळी मारली. त्यामुळे त्यांच्या या घोषणेचे सकारात्मक पडसाद तातडीने बघायला मिळाले आहेत. टॅक्समध्ये कपात केल्यानंतर कोणतीही सूट न घेणाऱ्या देशातील कंपन्या आणि नव्या उत्पादन कंपन्यांना आता २५.१७ टक्के कर द्यावा लागणार आहे. याव्यतिरिक्त कंपन्यांना आता कोणताही कर भरावा लागणार नाही. त्याचबरोबर आता कंपन्यांना MAT देखील भरावा लागणार नाही. त्यामुळे कॉर्पोरेट जगातासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे.

First Published on: September 20, 2019 12:30 PM
Exit mobile version