रोजगार निर्माण करण्यासाठी ‘मनरेगा’साठी ४० हजार कोटींची तरतूद

रोजगार निर्माण करण्यासाठी ‘मनरेगा’साठी ४० हजार कोटींची तरतूद

अर्थमंत्री निर्मला सीतारमण

स्तलांतरित मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी ‘मनरेगा’साठी ४० हजार कोटींची तरतूद केल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यानंतर देशभरातून लाखो मजुरांनी घराकडे स्थलांतर सुरू केलं आहे. या मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडल्या आहेत. घरी परतल्यामुळे या मजुरांच्या हाताला काम नाही आहे. यासाठी रोजगार उपलब्ध होण्यासाठी केंद्रानं उपाययोजना हाती घेतल्या आहेत. मनरेगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ४० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधून दिल्या जाणाऱ्या मदतीची घोषणा आज रविवारी केली. “आजच्या घडीला देशातील वेगवगेळ्या शहरात काम करणारे स्तलांतरित मजूर घरी जात आहे. त्यांच्या प्रवासाची सोय विशेष रेल्वेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांच्या तिकिटाचा ८५ टक्के खर्च केंद्रानं उचलला आहे. मजुरांना थेट मदतही देण्यात आली आहे,” असं सीतारामन म्हणाल्या.


हेही वाचा – ऑनलाइन शिक्षणासाठी १२ नवीन चॅनेल – अर्थमंत्री


“घरी परतल्यानंतर या मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे. या मजुरांच्या हाताला काम मिळावं यासाठी मनरेगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी सरकारनं मनरेगा योजनेसाठी अतिरिक्त ४० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे,” असं सीतारामन म्हणाल्या. मनरेगासाठी ६१ हजार कोटींच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. आता त्यामध्ये अतिरिक्त ४० हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. याचा फायदा मान्सून कालावधीमध्ये रोजगार निर्माण होण्यासाठी होईल.

 

First Published on: May 17, 2020 12:38 PM
Exit mobile version