दिल्लीमध्ये माजी महिला पत्रकारावर गोळीबार

दिल्लीमध्ये माजी महिला पत्रकारावर गोळीबार

दिल्लीमध्ये माजी महिला पत्रकारावर गोळीबार

दिल्लीच्या मयूर विहार परिसरामध्ये शनिवारी रात्री १२.३० वाजता एका कारवर गोळीबार करण्यात आला. यावेळी कार चालवत असलेल्या महिलेच्या हाताला गोळी लागली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी या महिलेला नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. महिलेवर सध्या उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, अशी शक्यता वर्तवली जात आहे की, लुटमारीच्या उद्देशाने महिलेवर गोळीबार केला असावा. मात्र पोलिसांना संशय आहे की, महिलेवर हा हल्ला कौटुंबिक कारणास्तव किंवा पूर्व वैमनस्यातून केला असावा.

महिला माजी पत्रकार आहे

पीडित महिलेची ओळख मिताली चंदोला अशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मिताली माजी पत्रकार आहे. ती शनिवारी रात्री उशिरा धर्मशीला हॉस्पिटलजवळून जात होती. त्याचवेळी तिच्या गाडीवर समोरच्या काचेवर आधी अंड्यासारखी वस्तू फेकून मारली त्यानंतर गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एक गोळी महिलेच्या उजव्या हाताला लागली. गोळीबाराचा आवाज एकताच आसपासच्या नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला धर्मशील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

कौटुंबिक वादातून हल्ल्याची शक्यता

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेवर कौटुंबिक कारणास्तवर किंवा पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याचा अंदाज आहे. मात्र त्याठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांचे असे म्हणणे आहे की, ज्या पध्दतीने महिलेच्या गाडीवर आधी अंड्यासारखी वस्तू फेकली गेली त्यानंतर गोळीबार केला गेला. त्यावरुन हा हल्ला लूटमारीच्या उद्देशाने केला गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरुन आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत याप्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.

First Published on: June 23, 2019 8:34 AM
Exit mobile version