तेलंगणातील ढगफुटीमागे परकीय षडयंत्र; मुख्यमंत्री केसीआर यांचा जावई शोध

तेलंगणातील ढगफुटीमागे परकीय षडयंत्र; मुख्यमंत्री केसीआर यांचा जावई शोध

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी पूरग्रस्त भागाचा हवाई पाहणी दौरा केला. यावेळी पुराचा सामना करणाऱ्या भद्रादी कोठागुडेम जिल्ह्याचे सर्वेक्षण करताना त्यांनी एक जावई शोध लावला आहे. राज्याच्या उत्तर भागात सुरु असलेल्या संततधार पावसात काहीतरी गडबड आहे. गोदावरी नदीच्या काठी ढगफुटीच्या घटनांमागे परकीय षडयंत्र असल्याचा अजब दावा त्यांनी केला आहे.

राव यांनी पुराच्या धोक्यापासून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी डोंगराळ भागात वसाहती उभारण्यासाठी शहर पुनर्वसन पॅकेज म्हणून 1,000 कोटींची घोषणा केली आहे. यावर ते म्हणाले की, ढगफुटीचा नवा पर्याय आला आहे. यामागे काहीतरी षडयंत्र आहे. हे कितपत खरे आहे हे आम्हाला माहीत नाही. काही देश आपल्या देशात ढगफुटीच्या घटना घडवत आहेत. यापूर्वी लेह (लडाख) येथे अशा घटना घडल्या, नंतर उत्तराखंडमध्ये. आम्हाला गोदावरी खोऱ्यासाठीही अशीच काही माहिती मिळाली आहे. हवामान बदलामुळे अशा प्रकारच्या आपत्ती उद्भवतात पण आपण आपल्या लोकांचे रक्षण केले पाहिजे.

धोका अजून टळलेला नाही : मुख्यमंत्री

पूरग्रस्त भागातील मदत आणि बचाव कार्याबाबत अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर केसीआर म्हणाले की, संततधार पावसामुळे सध्या परिस्थिती उद्भवली आहे. दरम्यान हवामान विभाग आणि काही खासगी हवामान विभागांच्या अहवालानुसार, 29 जुलैपर्यंत ही स्थिती कायम राहू शकते. त्यामुळे धोका अजून टळलेला नाही. दरम्यान पूरग्रस्त भागातील लोकांना मदत शिबारातून परत न पाठवण्याच्या सूचना देत त्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

भाजपने घेतले तोंडसुख

केसीआर यांच्या ढगफुटीच्या अजब वक्तव्याला भाजपने या शतकातील सर्वात मोठा विनोद म्हटले आहे. तेलंगणा भाजपचे अध्यक्ष आणि करीमनगरचे खासदार बंदी संजय कुमार म्हणाले की, केसीआर आपले अपयश लपवण्यासाठी नाटक करत आहेत. तेलंगणा भाजप अध्यक्षांनी केसीआर यांच्यावर कलेश्वरम प्रकल्पाच्या बुडण्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी परदेशी षड्यंत्राबद्दल बोलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि पक्षाचे खासदार ए रेवती यांनी सांगितले की, जर केसीआर यांच्याकडे ढगफुटीमागे विदेशी कटाची माहिती असेल तर ती इंटेलिजन्स ब्युरो, रॉ आणि केंद्र सरकारला द्यावी. ती मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे.

राव यांनी मुलुगु, भूपालपल्ली, कोथागुडेम, महबुबाबाद आणि निर्मल या जिल्हा प्रशासनांना पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून प्रत्येकी एक कोटी रुपये तातडीने देण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री केसीआर यांनी अर्थमंत्री हरीश राव यांना वैद्यकीय शिबिरे उभारण्यास, पुराच्या तडाख्याला तोंड देत असलेल्या लोकांसाठी पुरेसा औषध आणि अन्नपुरवठा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. गोदावरी नदीला सतत येणारा पूर पाहता त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणखी काही दिवस सतर्क राहण्यास सांगितले. गोदावरीतील पुराच्या वेळी लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि सखल भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सर्वेक्षण करण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यांचा सल्ला घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.


श्रावणातल्या पहिल्या सोमवारी बिहारमधील महेंद्रनाथ मंदिरामध्ये चेंगराचेंगरी, दोन महिलांचा मृत्यू


First Published on: July 18, 2022 12:45 PM
Exit mobile version