माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं निधन, वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं निधन, वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

नवी दिल्ली : जेडीयूचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्यांच्या मुलीने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यांची मुलगी सुभाषिनी शरद यादव यांनी फेसबुक पोस्टद्वारे ही बातमी सांगितली. वयाच्या 75 व्या वर्षी शरद यादव यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, जेडीयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष शरद यादव यांचे गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात गुरुवारी रात्री 9.30 वाजता निधन झाले.

2002 मध्ये जनता दलाची स्थापना झाल्यानंतर शरद यादव अनेक वर्षे पक्षाचे अध्यक्ष होते. तसेच ते सात वेळा लोकसभेचे खासदारही राहिले आहेत. प्रकृती आणि अनेक कारणांमुळे ते काही काळ सक्रिय राजकारणात दिसले नाहीत. शरद यादव यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले.


विशेषत: बिहारच्या राजकारणात त्यांनी अनेक वेळा महत्त्वाची भूमिका बजावली. शरद यादव हे अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. जेडीयूच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षांच्या निधनानंतर बिहारच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली. शरद यादव यांचा जन्म 1 जुलै 1947 रोजी मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे झाला. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण मध्य प्रदेशातूनच पूर्ण केले होते. त्यांनी जबलपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई केले.

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद यादव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदींनी ट्विट केले की, ‘शरद यादव यांच्या निधनाने खूप दुःख झाले. त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक कारकिर्दीत त्यांनी स्वत:ला एक खासदार आणि मंत्री म्हणून वेगळी ओळख मिळवून दिली. डॉ. लोहिया यांच्या आदर्शांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे, संवेदना. ओम शांती.’


हेही वाचाः ‘बीडीडी चाळ’ प्रकल्पात नियमबाह्य काही नाही, उच्च न्यायालयाचा निर्वाळा

First Published on: January 12, 2023 11:50 PM
Exit mobile version