मध्य प्रदेशामध्ये १० दिवसांत ४ भाजप नेत्यांची हत्या

मध्य प्रदेशामध्ये १० दिवसांत ४ भाजप नेत्यांची हत्या

प्रातिनिधिक फोटो

गेल्या महिन्यात मध्य प्रदेशमध्ये भाजपचा पराभव होऊन काँग्रेसची सत्ता आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. परंतु, काँग्रेसची सत्ता आल्यापासून मध्य प्रदेशमध्ये भाजपच्या नेत्यांची हत्या होत आहे. विशेष म्हणजे या १० दिवसांमध्ये भाजपच्या ४ नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी सोमवारी मध्य प्रदेशमध्ये सरकारच्या विरोधात आंदोलन केले आहे. राजकीय हेतूने या हत्या केल्या जात आहे, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.

१० दिवसांत ‘या’ ४ भाजप नेत्यांची हत्या

गेल्या १० दिवसांपासून ४ भाजप नेत्यांची हत्या अज्ञातांकडून करण्यात आली आहे. रविवारी सकाळी बडावानीमध्ये भाजपचे मंडल अध्यक्ष मनोज ठाकरेंची दगडाने ठेचून निघृण हत्या करण्यात आली. त्यांच्या मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला दगड आढळला आहे. याप्रकरणी पोलिसांना अद्यापही गुन्हेगार सापडलेला नाही. या घटनेनंतर रविवारी संध्याकाळी गुनामध्ये परमाल कुशवाह या तरुणाची गोळ्या झाडून हत्या झाली. हा तरुण भाजपचे संयोजक शिवराम कुशवाह यांचा नातेवाईक आहे. गुरुवारी संध्याकाळी प्रल्हाद बंधवार यांची भर बाजारात हत्या करण्यात आली. ते भाजप नेते लोकेंद्र कुमावत यांच्या दुकानात बसले होते. ते दुकानातून बाहेर पडताच बुलेटवरील एका मुलाने त्यांच्यावर गोळी झाडली. त्याअगोदर बुधवारी संध्याकाळी भाजप नेते संदीप अग्रवाल यांची हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे गर्दिची वर्दळ असलेल्या चौकात अज्ञात तरुणांनी गोळी झाडून त्यांची हत्या केली. परंतु, पोलिसांच्या हाती अद्यापही हल्लेखोर लागलेले नाहीत. विशेष म्हणजे ही हत्या पोलीस स्टेशनपासून अवघं १०० मीटर दूर आहे.


हेही वाचा – मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची हत्या!

First Published on: January 21, 2019 5:36 PM
Exit mobile version