काँग्रेसचं अध्यक्षपद गांधी परिवाराबाहेर? ‘या’ नेत्याच्या नावाची शिफारस

काँग्रेसचं अध्यक्षपद गांधी परिवाराबाहेर? ‘या’ नेत्याच्या नावाची शिफारस

देशातील पाच राज्यात झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये हालचाली सुरु झाल्या आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीत बैठक सुरु आहे. पाच राज्यातील पराभवानंतर पुन्हा एकदा नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून गांधी परिवाराकडून अध्यक्षपद इतरांकडे सोपवण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्या चर्चेला काँग्रेसच्या काही नेत्यांनी दुजोरा दिला. काँग्रेसमधील G23 सदस्यांनी मुकुल वासनिक यांच्या नावाची काँग्रेस अध्यक्षपदासाठी शिफारस केल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं एएनआयनं म्हटलं आहे.

पाच राज्यातील पराभवानंतर काँग्रेसच्या नेतृत्त्वावर सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. पुढे जायचं असेल नेतृत्व बदल आवश्यक असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी म्हटलं होतं. तसंच, गुलाम नबी आझाद यांच्यासह नाराज २३ नेत्यांनी देखील म्हटलं. काँग्रेसच्या कार्यकारिणीत नेमकं काय ठरणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

निवडणुकांमधील लाजीरवाण्या पराभवानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पक्षातील पदांचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीवर झळकलं होतं. त्यानंतर चर्चांना पेव फुटलं होतं. या साऱ्या प्रकारानंतर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत यावर खुलासा केला.

काँग्रेसमधील कथित राजीनाम्यांबाबत आलेलं वृत्त हे पूर्णपणे चुकीचं, खोडसाळ आणि अन्यायकारक असल्याचं सुरजेवाला म्हणाले. एका वृत्तवाहिनीने अशा प्रकारचा प्रोपोगंडा पसरवणारं वृत्त दाखवणं हे चुकीचं आहे. एखाद्या वृत्तवाहिनीने सत्ताधारी भाजपच्या सांगण्यावरून काल्पनिक स्रोतांच्या आधारे अशाप्रकारच्या अप्रमाणित प्रचारकी बातम्या प्रसारित करणे अयोग्य असल्याचं सुरजेवाला म्हणाले.

 

First Published on: March 13, 2022 7:27 PM
Exit mobile version