…आणि फ्रान्समध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष झाला

…आणि फ्रान्समध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष झाला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फ्रान्स दौरा

गणेशोत्सवाला काहीच दिवस शिल्लक आहेत. राज्यासह देशातील काही भागांमध्ये गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे. पण आज चक्क फ्रान्समध्येच ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष ऐकू आला. निमित्त होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्याचे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्त त्यांनी तेथील भारतीय जनतेशी सुसंवाद साधला. ”गणेशोत्सव लवकरच येत आहे”, असे म्हणत ”गणेशोत्सवात फ्रान्स मिनी इंडिया होतो असे मला सांगण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच फ्रान्समध्ये देखील ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष ऐकू येईल”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. यावेळी उपस्थित भारतीयांनी ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत पंतप्रधानांच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

”गणेशोत्सव पॅरिसच्या सांस्कृतिक दिनदर्शिकेचा भाग असल्याचं मला सांगण्यात आलं आहे. यादिवशी पॅरिसचे मिनी इंडियात रुपांतर होते. या अर्था ”एके दिवशी आपल्याला पॅरिसमध्येही ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष ऐकू येईल”, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित भारतीयांना जन्माष्टमीच्याही शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी नव्या भारताची स्थिती सुद्धा सांगितली. ते म्हणाले की, ”नव्या भारतात भ्रष्टाचार, कुटुंबवाद, भाऊ-पुतण्या वाद, जनतेच्या पैशांची लूट, दहशतवाद या गोष्टींना स्थान नाही. ज्याप्रकारे हे प्रकार थांबवण्यासाठी आज प्रयत्न होत आहेत असे प्रयत्न यापूर्वी कधीच झाले नाहीत. नव्या भारतात थकणं आणि थांबण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. “नवं सरकार येऊन फक्त ७५ दिवस झालेले आहेत. नव्या सरकारला १०० दिवसही पूर्ण झालेले नाहीत. या काळात साधारणपणे उत्सवाचं वातावरण असतं. पण आम्ही मात्र सेलिब्रेशनपासून दूर राहिलो. सत्तेवर येताच आम्ही योग्य धोरणं आणि दिशेने जात एकामागोमाग एक मोठे निर्णय आम्ही घेतले”, असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

हेही वाचा – ‘जेट’ एअरवेजचे संस्थापक गोयल यांच्या निवासस्थानी ईडीचे छापे

‘तिहेरी तलाक’वरसुद्धा केले भाष्य

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिहेरी तलाक प्रथा रद्द करण्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, ”’तिहेरी तलाक’ हे एक अमानवीय कृत्य होतं. त्यामुळेच आम्ही ते संपवून टाकले. महिलांचा सन्मान करणे आवश्यक आहे.” ”नव्या भारतात मुस्लिम महिलांसोबत होणारा अन्याय कसा स्विकार केला असता?”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर उपस्थित भारतीयांनीसुद्धा मोदी है तो मुमकीन है अशा घोषणा दिल्या. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मोदी है तो मुमकीन है मुळे नाही, तर देशातील जनतेने मतदान दिल्यानेच’ हे शक्य झाल्याचे सांगितले.

First Published on: August 23, 2019 5:37 PM
Exit mobile version