हेअरस्टाईल बिघडली म्हणून मुलीने संपवले आयुष्य

हेअरस्टाईल बिघडली म्हणून मुलीने संपवले आयुष्य

फोटो प्रातिनिधीक

सुंदर दिसण्यासाठी आपण वाटेल ते करायला तयार असतो. त्वचेला तजेला आणण्यासाठी ,केस मऊसूत आणि छान दिसण्यासाठी पार्लरमध्ये तासनंतास घालवतो. अशीच सुंदर दिसण्यची आस घेऊन केसांची हेअरस्टाईल करायला गेलेल्या एका मुलीच्या बाबतीत मात्र असे काही घडले की, तिने आपले आयुष्यच संपवले. म्हैसूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून नेहा गंगाम्मा असे या मुलीचे नाव आहे.

नेमकं काय झालं?

म्हैसूरमधील गोकुलम परिसरात पेईंग गेस्ट म्हणून १९ वर्षीय नेहा राहत होती. ती BBA चे शिक्षण घेत होती. म्हैसूरमधील एका ब्युटी पार्लरमध्ये तिने हेअर स्ट्रेटनिंग करुन घेतले. पण त्यानंतर तिचे केस गळू लागले. तिची केसगळती वाढू लागली. तिने या संदर्भात तिच्या आईला देखील सांगितले. केस गळतीमुळे तिचे केस दिवसेंदिवस पातळ होत होते. तिच्या केसांविषयी तिला कोणी विचारल्यानंतर त्यांना काय उत्तर द्यायची या भितीने तिने कॉलेजला देखील जाणे बंद केले. तिचे आईशी सतत बोलणे सुरु होते. तिचे आई-वडील कोडगूमध्ये राहायला होते. शिक्षणासाठी नेहा पेईंग गेस्ट म्हणून राहत होती. २८ ऑगस्ट नंतर तिचा आईशी कोणताही संपर्क झाला नाही. त्यानंतर तिच्या पालकांनी २९ ऑगस्ट रोजी पोलीसात तक्रार दाखल केली

हाती लागला नेहाचा मृतदेह

नेहा हरवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर तिचा शोध सुरु झाला. पण पोलिसांच्या काहीच हाती लागत नव्हते. पालकांनी पोलिसांना ती नैराश्याच्या गर्तेत असल्याचे सांगितले. त्यानंतर १ सप्टेंबर रोजी एका तरुणीचा मृतदेह बाळेले येथील नदीमध्ये सापडला. हा मृतदेह नेहाचा असल्याचे तिच्या पालकांनी तिच्या बोटातील अंगठीमुळे ओळखले.

नेहा गंगाम्मा

टक्कल होण्याची नेहाला भिती

केस गळू लागल्यानंतर नेहाला टक्कल पडेल याची भिती सतत सतावू लागली होती. ती तणावाखाली असल्याचे तिच्या पालकांनी सांगितले होते. या तणावामुळेच तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

योग्य सल्ला घेऊनच उपचार घ्या

अनेकदा पार्लरमध्ये वापरले जाणारे साहित्य कोणत्या दर्जाचे आहे ? त्याची एक्सपायरी डेट काय आहे? हे तपासून पहा. तुमच्या शरिराला या केमिकल्सपासून काही हानी पोहोचणार नाही ना? हे पाहण्यासाठी ते तपासून पहा. सुंदर दिसण्यासाठी काहीही न पाहता आपण पार्लरमध्ये जे सांगितले जाते ते करतो. पण असे करणे घातक ठरु शकते.

First Published on: September 3, 2018 12:22 PM
Exit mobile version