आता ब्रिटनच्या शाळेतही स्कर्टवर बंदी

आता ब्रिटनच्या शाळेतही स्कर्टवर बंदी

शाळेत स्कर्टवर बंदी (प्रातिनिधिक चित्र)

आपल्या देशात जेव्हा शाळकरी मुलींच्या गणवेशातील स्कर्टवर बंदी घातली जाते, तेव्हा मोठा गदारोळ माजतो. आधुनिकता विरूद्ध संस्कृती या विषयांवर चर्चा सुरू होतात. आता लंडनमधील एका शाळेत मुलींना स्कर्ट परिधान करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शाळकरी मुलींच्या गणवेशात स्कर्टचा पर्याय लवकरच संपुष्टात येणार आहे. त्याऐवजी त्यांना फुल पँट दिली जाणार आहे. संपूर्ण ब्रिटन शहरात शालेय विद्यार्थिनींसोबतच्या होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी तसेच मुलगा-मुलगी समानता निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

४० शाळांमध्ये स्कर्ट बंदी

ब्रिटनमधील साधारण ४० शाळांनी मुलींच्या गणवेशात स्कर्टवर बंदी घातली असून इतर शाळाही स्कर्टवरील बंदीचा विचार करत आहेत. शाळेमध्ये लिंग भेदभाव ही मानसिकता बदलण्यासाठी शाळा प्रशासन अशा पद्धतीचा निर्णय घेत असून सर्व विद्यार्थ्यांसाठी ट्राउजरचा पर्याय उपलब्ध केला जात आहे. ईस्ट ससेक्स येथील प्रॉयरी शाळेमध्ये गेल्याच वर्षी स्कर्टवर बंदी घालण्यात आली होती. त्यावर मुला-मुलींच्या गणवेशात फरक का केला जातो, अशी विचारणा वारंवार पालक करत असल्याने हा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण शाळेने दिले होते.

भारतातही बंदीवरून गदारोळ

आपल्या देशातही मुलींच्या कपड्यांवरून वारंवार गदारोळ माजतो. प्रामुख्याने कॉलेज प्रशासन विद्यार्थिनींच्या स्कर्ट, शॉर्ट्स तर कधी जिन्स घालण्यावरही बंदीचा निर्णय घेते. त्यांच्या या निर्णयावर विद्यार्थी तर नाराज होतातच शिवाय समाजातील आधुनिक विचारवंतदेखील याला विरोध करतात. दक्षिणेतील बहुतांश भागात शाळकरी मुलींच्या गणवेशात बदल केल्याची उदाहरण आहेत. त्याशिवाय चंदीगड येथेही काही पब्समध्ये मुलींना स्कर्ट आणि शॉर्ट घालून येण्यास मनाई करण्यात आली होती. त्यावरही सोशल मीडीयावर चांगलच प्रकरण गाजल होतं.

First Published on: July 2, 2018 2:05 PM
Exit mobile version